लाल दिव्यासाठी डफळापूरच्या आशा पल्लवित

By Admin | Updated: December 22, 2016 23:38 IST2016-12-22T23:38:31+5:302016-12-22T23:38:31+5:30

इच्छुकांची गर्दी : चार महिन्यांपासून कार्यक र्त्यांची तयारी सुरु, तुल्यबळ उमेदवारांमुळे लढतीत रंगत

Daflapur's hopes for the Red Lunar flame | लाल दिव्यासाठी डफळापूरच्या आशा पल्लवित

लाल दिव्यासाठी डफळापूरच्या आशा पल्लवित

संजयकुमार गुरव ल्ल डफळापूर
जत तालुक्यातील डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाला असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही खुले असल्याने, लाल दिव्याची गाडी मिळविण्याच्या डफळापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबग गेल्या चार महिन्यांपासूनच सुरू आहे. मात्र ही लढत तितकी सोपी किंवा सोयीस्कर नसल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कारण प्रत्येक इच्छुक उमेदवार तुल्यबळ आहे.
काँग्रेसचे नेते सुनील बापू चव्हाण यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे. त्यांच्या नसण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे खंदे समर्थक माजी सभापती मन्सूर खतीब विकास आघाडीत असल्याने काँग्रेस पक्षाबाहेर आहेत. मात्र सध्या ते काँग्रेसकडे जिल्हा परिषदेची उमेदवारी मागत आहेत. दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेले व सध्या डॉ. पतंगराव कदम यांच्या संपर्कात असलेले माजी समाजकल्याण सभापती आकाराम मासाळ स्वगृही येण्याच्या तयारीत आहेत. शिवाय काँग्रेस पक्षात गेली सात वर्षे सक्रिय असलेले आणि ज्यांनी आमदार विलासराव जगताप यांच्या गटात राहून सलग दोनवेळा जिल्हा परिषद सदस्यपद स्वत:च्या घरी ठेवले, ते माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ काँग्रेसची उमेदवारी मागत आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही, निवडणूक लढविणार असल्याचे ते सांगत आहेत.
डफळापूर पंचायत समिती गणातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी सुनील चव्हाण यांचे पुत्र दिग्विजय चव्हाण तयारी करीत आहेत. कुडणूरचे सरपंच अज्ञान पांढरे हेही जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्या संपर्कात असून, त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. बाज पंचायत समिती गणातून जत पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मी मासाळ यांचे पती आप्पा मासाळ काँग्रेसमध्ये नाहीत, तरीही ते काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत. काँग्रेसकडून अरुण सरगर हेही इच्छुक आहेत.
डफळापूर जिल्हा परिषद निवडणूक भाजपतून लढविण्यासाठी डफळापूर येथील जनकल्याण पाणीपुरवठा योजनेचे जनक प्रा. रणजित चव्हाण आणि आ. प्रकाश शेंडगे यांचे समर्थक शंकरराव वगरे इच्छुक आहेत.
डफळापूर पंचायत समितीसाठी भाजपमधून सज्जनराव चव्हाण, पोपट पुकळे, परशराम चव्हाण, मोहन शांत, सुभाषराव गायकवाड, किरण कोळी, प्रवीण शिंदे, माधवराव चव्हाण तसेच माजी उपसभापती डॉ. देवयानी गावडे इच्छुक आहेत. बाज पंचायत समिती गणासाठी भाजपतून तम्मा गडदे, अरविंद गडदे, संजय गडदे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीची भूमिका पक्षाच्या बैठकीनंतर ठरणार आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर, जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या रूपाली पाटील यांचे दीर राम पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पाटील हेही इच्छुक आहेत. डफळापूर पं. स. गणासाठी सांगली बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष जयवंत माळी, तर बाज पं. स. गणासाठी प्रल्हाद गडदे इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील डफळापूर गटात उमेदवारीची चाचपणी करीत आहेत. ते स्वत: जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असल्याचे समजते. शिवसेनेचे जत तालुकाप्रमुख बसवराज पाटील यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या गटात शिवसेनेचे कार्यकर्ते तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे.
मतदारसंघ पुनर्रचना झाली असून, डफळापूर गटात कंठी गाव समाविष्ट केले आहे. गटाचे २१ हजार मतदान आहे. डफळापूर पंचायत समिती गणात डफळापूरचे पाच प्रभाग आणि मिरवाड, जिरग्याळ, खलाटी, शेळकेवाडी, कुडणूर, शिंगणापूर असे मिळून १६००० मतदान आहे, तर बाज पंचायत समिती गणात बाजचे चार प्रभाग आणि बेळुंखी, अंकले, हिवरे, डोर्ली, धावडवाडी, कंठी असे १३ हजार मतदान आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव करून राष्ट्रवादीने तीनही जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. आ. विलासराव जगताप यांच्या गटातून निवडून आलेल्या जि. प. सदस्या रूपाली पाटील, डफळापूर पं. स. सदस्या डॉ. देवयानी गावडे व बाज पं. स. मधून निवडून आलेल्या सभापती लक्ष्मी मासाळ यांनी डफळापूर जि. प. गटामध्ये रस्ते, रुग्णालयाच्या इमारती, शाळेच्या इमारती आदी काम केले आहे. मात्र राष्ट्रवादीतून मोठा गट भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला घरघर लागली आहे.

Web Title: Daflapur's hopes for the Red Lunar flame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.