वासुंबे उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची विट्यात ‘दबंगगिरी
By Admin | Updated: August 12, 2015 23:23 IST2015-08-12T23:23:43+5:302015-08-12T23:23:43+5:30
राजकीय दबाव टाकून त्रास : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी हैराण ’

वासुंबे उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची विट्यात ‘दबंगगिरी
प्रमोद रावळ - आळसंद खानापूर तालुक्यातील वासुंबे उपकेंद्रातील आरोग्य सेविकेने विटा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘दबंगगिरी’ सुरू केली असून, राजकीय दबाव टाकून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हैराण करून सोडले आहे. वासुंबेत नेमणूक असताना, तिने विट्यातील सदनिका जबरदस्तीने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुख्यालय सोडून तिने विट्यात ठाण मांडले आहे. संतप्त ग्रामस्थांनी खातेनिहाय चौकशीची मागणी केली आहे.
वेजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वासुंबे उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून अनिता बाबूराव दौंड जून २०१३ पासून काम करीत आहेत. त्यांची नेमणूक तेथेच आहे. परंतु, वासुंबे उपकेंद्रातील निवासस्थानाची इमारत राहण्यास योग्य नसल्याचे कारण सांगत त्यांनी विट्यातच ठाण मांडले आहे. वास्तविक मुख्यालयात वास्तव्य असणे अनिवार्य असताना, विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदनिका त्यांनी ताब्यात घेतली आहे.
वासुंबेच्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विट्यातील सदनिका सोडण्याबाबत त्यांना नोटिसा दिल्या. परंतु, त्या नोटिसांना दौंड यांनी केराची टोपली दाखविली. एका महिला मंत्र्याची जवळची कार्यकर्ती असल्याचे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा कार्यक्रम दौंड यांनी राबविला. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही हतबल झाले आहेत. स्थानिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही त्यांनी वाद घातल्याचे समजते.
वासुंबे उपकेंद्रात आरोग्यसेविका नसल्याने ग्रामस्थांनाही आरोग्य सुविधा मिळत नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी दौंड यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी केली आहे.