जनतेच्या सुरक्षेसाठी आता सायबर संस्कार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST2021-03-15T04:24:30+5:302021-03-15T04:24:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाइल आणि त्याव्दारे होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने ...

Cyber rites for public safety | जनतेच्या सुरक्षेसाठी आता सायबर संस्कार उपक्रम

जनतेच्या सुरक्षेसाठी आता सायबर संस्कार उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाइल आणि त्याव्दारे होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने ‘सायबर संस्कार’ अभियान सुरू करण्यात आले आहे. सायबरविषयक गुन्हे आणि फसवणुकीचा प्रकार घडल्यास काय करावे यासाठी अगदी ग्रामीण पातळीपर्यंत प्रबोधन करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. गावपातळीवरील पोलीस पाटील, दक्षता समितीचे सदस्यांनाही यात सामावून घेत सायबरविषयक माहिती देण्यात येणार आहे.

इतर कुठल्याही गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत केवळ शहरात मर्यादित असलेले फसवणुकीचे लोण आता स्मार्टफोनमुळे ग्रामीण भागातही पोहोचले आहे. त्यामुळेच आता सर्वच जनतेत जागरूकता करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.

नव्या काळातील सायबरविषयक गुन्हे कोणते, ते कसे ओळखावेत, कोणती काळजी घ्यावी, फसवणूक झाल्यास काय करावे, तक्रार कुठे करावी याबाबतची माहिती या अभियानातून दिली जाणार आहे. सायबर समस्यांच्या निराकरणासाठी नागरिकांशी मुक्त संवाद साधल्यास त्याचाही फायदा होणार आहे.

या अभियानात महिलाविषयक सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात येणार आहे. अश्लील फाेटो पाठवणे, धमकीचे ईमेल पाठविणे, लैंगिक फाेटो, संदेश पाठवून ब्लॅकमेल करणे यासह इतर गुन्ह्यांची माहिती देऊन पीडितेला तक्रार देण्याविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

चौकट

हा आहे ‘सायबर संस्कार’

वैयक्तीक माहिती (पिन, आयडी, पासवर्ड) अनोळखी व्यक्तीला शेअर न करणे.

आपल्या खात्याचे पासवर्ड सक्षम ठेवणे

सोशल मीडिया साईटवर आपले फोटो व माहिती शेअर करताना काळजी घेणे.

वेळोवेळी पासवर्ड बदलणे

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधणे.

कोट

जिल्ह्यातील सर्व घटकांना सायबरविषयक गुन्ह्यांची माहिती व्हावी व त्यांची फसवणूक टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुन्ह्यांचे स्वरूप जनतेपर्यंत पोहोचले तर अशाप्रकारे फसवणूक टाळता येऊ शकते. त्यामुळे अभियानाचा लाभ घ्यावा.

संजय क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

Web Title: Cyber rites for public safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.