दरीबडची : जत तालुक्यात उष्ण व कोरडे हवामानाने बेदाणा निर्मितीस पोषक वातावरणामुळे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट बेदाणा निर्मिती या पट्ट्यामध्ये होते. त्यामुळे बेदाणा निर्मितीचे शेड उभे राहिले आहेत. बेदाणा निर्मितीचे नेटिंग मशीन उभारले गेले आहेत. बेदाणा निर्मिती शेड, नेटिंग मशीनमुळे दुष्काळातील मंदावलेल्या अर्थकारणास गती मिळाली आहे.तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ११ हजार ८७० एकर आहे. द्राक्ष पीक नगदी पीक म्हणून घेतले जाते. निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. बेदाणाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी बेदाणा निर्मिती करीत आहे. पूर्व भागातील उमदी, सिद्धनाथ बेळोंडगी, भिवर्गी, निगडी बुद्रुक, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, जालिहाळ खुर्द, संख, जालिहाळ बुद्रुक, कोंतवबोबलाद, करजगी या भागात मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती केली जाते.हिरव्या रंगाचा, सुटेखाण प्रतीच्या बेदाण्याची निर्मिती केली जाते. उष्ण व कोरड्या वातावरणामुळे बेदाणा लवकर सुकतो. त्याला रंग, चकाकी येते. दर्जेदार व उच्च प्रतीचा बेदाणा तयार होतो. साधारण चार किलो द्राक्षापासून एक ते दीड किलो बेदाणा तयार होतो. यावर्षी बेदाणा निर्मितीची औषधे महागली आहेत. एक किलो बेदाणाला ३१ रुपये खर्च येतो. सध्या बेदाणाला २७५ ते ३०० रुपये दर मिळत आहे.बेदाणा शेडला तीन महिने भाडे मिळते. द्राक्षे काढणे, वाॅशिंग करणे, पॅकिंग करणे, रॅकवर टाकणे, बेदाणा झाडणे, द्राक्षाची खरड छाटणी आदी कामात महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध होतो. बेदाणा करण्यासाठी नेटिंग मशीन आहेत. बेदाणा प्रक्रिया सुलभ झाली आहे. वेळ व श्रमात बचत झाली आहे. मशीनमध्ये बेदाणा गुणवत्ताची प्रतवारी व वाॅशिंग केले जाते. उमदी, संख, सिद्धनाथ, दरीबडची, जालिहाळ खुर्द, भिवर्गी फाटा, कागनरी, मुंचडी येथे बेदाणा नेटिंग मशीन आहेत.
शीतगृहासाठी प्रयत्न व्हावेतबेदाणास परदेशात मोठी मागणी आहे. तालुक्यात बेदाणाचे उत्पादन लक्षात घेता मार्केटिंगची सोय उपलब्ध करून दिल्यास फायदा होणार आहे. शीतगृह तासगाव, कुपवाड, सांगली येथे आहेत. हे अंतर लांब आहे. तालुक्यात शीतगृह व मार्केट उपलब्ध झाल्यास फायदा होईल असे माजी उपसरपंच आमसिद्ध बिरादार यांनी सांगितले.
बेदाणाची वैशिष्ट्ये
- सुटेखाणे साईज
- हिरव्या रंगाचा आकर्षक बेदाणा
- साखरेचे प्रमाण अधिक
- २ सें.मी पेक्षा जास्त लांबी व फुगीर टाईपचा बेदाणा
- पिवळ्या रंगाचा बेदाणा
- माणिक चमन वाणाची द्राक्षे