संजयनगर, पंचशीलनगरमधील गुन्हेगारीवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:01+5:302021-02-11T04:28:01+5:30

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर व पंचशीलनगर परिसरात गुन्हेगारी आणि लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे संशयित आरोपीवर कठोर ...

Curb crime in Sanjaynagar, Panchsheelnagar | संजयनगर, पंचशीलनगरमधील गुन्हेगारीवर आळा घाला

संजयनगर, पंचशीलनगरमधील गुन्हेगारीवर आळा घाला

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर व पंचशीलनगर परिसरात गुन्हेगारी आणि लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे संशयित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे करण्यात आली आहे. संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांना जिल्हा सुधार समितीचे ॲड. अमित शिंदे यांनी यासंदर्भात निवेदन दिले.

शहरातील संजयनगर, अभयनगर, चैतन्यनगर, पंचशीलनगर, घन:श्यामनगर, विकासनगर, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर, शिवोदयनगर, महालक्ष्मीनगर, साईराम कॉलनी, कृष्णाईनगर तसेच कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात लूटमार व घरफोडीच्या घटना घडत आहेत. भुरट्या चोरांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याचा विचार करून पोलीस प्रशासनाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. स्थानिक गुन्हेगारांचे गुन्हेगारी क्षेत्रातील जाळे नेस्तनाबूत करावे. बेकायदा व्यवसायाचे अड्डे उद्धवस्त करावेत. सराईत गुन्हेगारांची जामिनावर मुक्तता होऊ नये, याकरिता सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडावी. तसेच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी नियमित क्षेत्रीय सभा, मोहल्ला कमिटी व शांतता कमिटी बैठक आदी उपक्रम राबवावेत आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी महालिंग हेगडे, जयंत जाधव, रमेश डफळापुरे, बापू कोळेकर, ॲड. इंद्रजित शिंदे, बबन शिंदे, सुनील मोहिते, सोनू गवळी, विजय माळी, अमोल माळी, सद्दाम कलावंत, पांडुरंग काळे, राम पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-१०दुपाटे३

फोटो ओळ : सांगलीतील संजयनगर व पंचशीलनगरमधील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालावा, या मागणीचे निवेदन ॲड. अमित शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांना दिले.

Web Title: Curb crime in Sanjaynagar, Panchsheelnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.