आटपाडी प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:18+5:302021-09-03T04:27:18+5:30
आटपाडी : आटपाडी प्रशासकीय इमारतीच्या भिंती मावा व गुटख्याच्या पिचकारीने जागोजागी रंगल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ...

आटपाडी प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस
आटपाडी : आटपाडी प्रशासकीय इमारतीच्या भिंती मावा व गुटख्याच्या पिचकारीने जागोजागी रंगल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
खाबूगिरीने बरबटलेल्या प्रशासनाला याकडे बघण्यास वेळच नाही. आटपाडी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये एकत्रित असावीत, या उदात्त हेतूने शासनाने तालुक्याच्या ठिकाणी भव्य अशी प्रशासकीय इमारत उभारली आहे. अनेक कार्यालये या प्रशासकीय इमारतीमध्ये आहेत. मात्र, यातील कोणत्याही कार्यालयातील प्रमुखांना आपल्या कार्यालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
प्रशासकीय इमारतीच्या जिना, कोपरा याठिकाणी अनेक दिवसांपासून मावा व गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या आहेत तर स्वछतागृहाशेजारीच अडगळीचे सामान काही कार्यालयांनी ठेवले आहे. अनेक स्वच्छतागृह तर बंदच करत त्याला कुलपे लावली आहेत. यामुळे इमारतीच्या अनेक भिंती या लाल रंगाने रंगल्या असून, तेथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे.
दररोज अनेक कामांसाठी तालुक्यातील शेकडो नागरिक प्रशासकीय कार्यालयात येत असतात. अनेक ठिकाणच्या अस्वच्छतेने प्रशासकीय इमारतीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
चाैकट
पारदर्शी कारभाराची अपेक्षा
स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करते की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सर्व कार्यालयाच्या प्रमुखांना स्वच्छतेबाबतीत केव्हा जाग येणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या इमारतीमध्ये स्वच्छतेसोबत पारदर्शी कारभार ठेवण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.