शहरात चार तासांसाठी रस्त्यावर गर्दीचा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:45+5:302021-06-02T04:20:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची रुग्णसंख्या घटताच जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली खरी, पण ...

शहरात चार तासांसाठी रस्त्यावर गर्दीचा पूर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची रुग्णसंख्या घटताच जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली खरी, पण रस्त्यावरील गर्दी, निर्बंधांना हरताळ आणि बेफिकीर सांगलीकर पाहता काळजी वाढविणारे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. फळे, भाजीपाला, किराणासह अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह बिगर अत्यावश्यक दुकानेही सुरू होती. त्यामुळे महसूल, पोलीस, महापालिका प्रशासन आहे की नाही, अशीच स्थिती शहरातील बाजारपेठेत होती.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन लागू केला. सर्वच दुकाने, भाजी, फळविक्री बंद करण्यात आली. केवळ औषधे, दूध याच सेवा पंधरा दिवसांपासून सुरू होत्या. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्याही घटली. हजारापेक्षा कमी रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. सकाळी सात ते अकरा या चार तासांसाठी ही मुभा देण्यात आली आहे; पण खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
शहरातील मार्केट यार्ड, मारुती रोड, गणपती पेठ, रिसाला रोडवर भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. कुठेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नव्हते. त्यातच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. बाजारपेठेतील सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. मार्केट यार्डात सकाळी सात वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गणपती पेठेतही हीच स्थिती होती. भाजीपाला खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.
चौकट
आम्हाला कोण अडविते?
१. फळ व भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर बसून विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या विक्रेत्यांनी रस्त्याकडेला हातगाडे लावून विक्री सुरू केली होती. या हातगाड्यांवर खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. काही विक्रेते हातगाडी घेऊन गल्लीबोळात फिरत होते.
२. मार्केट यार्ड, गणपती पेठेतील किराणा मालाची दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असताना दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकानेही सुरू होती.
३. सकाळी अकरापर्यंतची वेळ असताना दुपारी एक-दोन वाजेपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते.
चौकट
पोलीस केवळ चौकांमध्येच तैनात
शहरातील विविध चौकांत पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे पोलीस रस्त्यावर आहेत. चौकाचौकात बॅरिकेड्सही लावण्यात आली आहेत. तरीही नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता. अकरानंतर काही चौकांत पोलिसांनी वाहने अडवून विचारणा सुरू केली होती.