आंबे, भाजीपाला खरेदीसाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:21+5:302021-05-14T04:25:21+5:30
सांगली : संचारबंदी लागू असतानाही सांगलीत गुरुवारी पहाटे अवैधरित्या भरलेल्या होलसेल भाजी आणि आंबे विक्रीचा बाजार भरला. खरेदीदारांनी मोठी ...

आंबे, भाजीपाला खरेदीसाठी उसळली गर्दी
सांगली : संचारबंदी लागू असतानाही सांगलीत गुरुवारी पहाटे अवैधरित्या भरलेल्या होलसेल भाजी आणि आंबे विक्रीचा बाजार भरला. खरेदीदारांनी मोठी गर्दी केल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच महापालिका व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. विक्रेत्यांकडील माल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ज्योतिरामदादा आखाड्यासमोर कोल्हापूर रस्त्यावर होलसेल भाजीपाला बाजार भरत आहे. गुरुवारी त्यात फळविक्रेत्यांनीही सहभाग घेतला. अक्षयतृतीया असल्याने आंबे खरेदीसाठी किरकोळ विक्रेत्यांनी व नागरिकांनीही याठिकाणी गर्दी केली. याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यावेळी कोल्हापूर रोड, रामनगर, फळ मार्केट परिसरात होलसेल व्यापाऱ्यांनी आंबा आणि भाजीपाला मालाची अवैध विक्री सुरू केली होती.
गर्दीमुळे संपूर्ण रस्ता भरुन गेला होता. वाहनांनाही वाट शिल्लक नव्हती. गर्दी व गोंधळ वाढल्याने त्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली. मार्केट कमिटी तसेच महापालिका प्रशासनाकडून वारंवार होलसेल बाजार न भरविण्याविषयी तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यापारासाठी एकत्र न येण्याविषयी सूचना देण्यात येत होत्या. त्यांना ठेंगा दाखवित होलसेल व किरकोळ विक्रेत्यांनी बाजार भरविला. अवैधरित्या होलसेल भाजीपाला विक्री सुरू असल्याचे तसेच आंब्याची विक्री सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संयुक्त पथकाने होलसेल बाजारावर कारवाई करत व्यापाऱ्यांचा संपूर्ण माल जप्त केला आहे तसेच कोल्हापूर रोडवरील आणखी एके ठिकाणी सुरू असणाऱ्या आंब्याच्या होलसेल व्यापारावरसुद्धा पथकाने कारवाई करीत आंब्याचा साठा जप्त केला. बाहेरगावाहून विशेषकरून कोकणातून विनापरवाना विक्रीसाठी आलेली आंब्याची वाहनेही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा
होलसेल भाजीपाला व आंबा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कारवाईत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, प्रणिल माने, गणेश माळी, वैभव कुदळे, किशोर कांबळे आदींनी भाग घेतला.
चौकट
काहींना लाठीने फोडले
पोलीस आल्यानंतरही लवकर न हटणाऱ्या काही किरकोळ विक्रेत्यांना लाठीने फोडले. वाहने व गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अर्ध्या तासात हा बाजार उठला.