दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:14+5:302021-03-31T04:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी राज्य शासनाने दिलेली मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत ३१ डिसेंबरला संपणार ...

दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी राज्य शासनाने दिलेली मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत ३१ डिसेंबरला संपणार असल्याने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील १३ दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून गर्दी झाली आहे.
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी मुद्रांक शुल्क सवलत जाहीर करून बांधकाम क्षेत्रास दिलासा दिला होता. डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कमध्ये ३ टक्के सवलत देण्यात आली होती. जानेवारी ते मार्च २०२१ या काळात ही सवलत ३ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आली आहे. मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज निष्पादीत केल्यानंतर दस्त नोंदणीसाठी चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळेच ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी कार्यालयांमध्ये गर्दी केली जात आहे.
सांगली जिल्हयातील एकूण १३ दुय्यम निबंधक कार्यालयात दोन दिवसांपासून गर्दी होत आहे.
सांगलीच्या नोंदणी कार्यालयातही मंगळवारी दिवसभर मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नागरिकांची व बांधकाम व्यावसायिकांची लगबग सुरू होती. कोणत्याही स्थावर मिळकतीचे अभिहस्तांतरणपत्र, विक्रीपत्र तसेच २९ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा भाडेपट्टी करार या दस्ताऐवजांचे मुद्रांकशुल्क भरण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठा प्रतिसाद आहे.
योजना लागू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची सवलत स्थावर मालमत्ता खरेदीदारांनी पदरात पाडून घेतली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांतही मोठ्या प्रमाणावर दस्तनोंदणी झाली आहे. डिसेंबरअखेरची सवलत मिळावी म्हणून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मोठी दस्तनोंदणी झाली. त्याचबरोबर डिसेंबरअखेर केवळ मुद्रांक शुल्क भरुन नंतर दस्तनोंदणी करण्याचे प्रमाणही मोठे होते. आता उर्वरित २ टक्के सवलतीसाठीही तशीच पद्धत अवलंबिण्यात येत आहे.
कोट
जिल्ह्यातील सर्व म्हणजे १३ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. बुधवारी ३१ मार्च रोजीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- साहेबराव दुतोंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली