गणरायाला निरोप देण्यासाठी सांगलीमध्ये गर्दी

By Admin | Updated: September 12, 2016 00:27 IST2016-09-12T00:27:58+5:302016-09-12T00:27:58+5:30

गर्दीचा उच्चांक : महापालिकेच्या कृत्रिम कुंडातही मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन

A crowd in Sangli to send a message to Ganaraya | गणरायाला निरोप देण्यासाठी सांगलीमध्ये गर्दी

गणरायाला निरोप देण्यासाठी सांगलीमध्ये गर्दी

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ची भावनिक साद घालत रविवारी सातव्या दिवशी गणेश विसर्जनाला कृष्णाकाठावर गर्दी झाली होती. रविवारची सुट्टी आणि परंपरेनुसार सातव्या दिवशी विसर्जनाला अधिक प्राधान्य असल्याने, दुपारपासूनच घाटावर गर्दी झाली होती. रविवारी कृष्णा नदीसह महापालिकेने शहरात तसेच उपनगरांमध्येही तयार केलेल्या विसर्जन कुंडातही मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
रविवारी गणेश विसर्जनाचा सातवा दिवस होता, पण मूळ नक्षत्रामुळे तर्कवितर्क लढविले जात होते. यावर ज्योतिषांमध्येही मतभिन्नता होती. मात्र, गणेशचतुर्थीला मुहूर्तावरच गणरायाचे आगमन झाल्याने विसर्जनास अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया पंचांग अभ्यासकांनी व्यक्त केली होती.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने दुपारपासूनच सरकारी घाट, माई घाट, विष्णू घाट येथे घरगुती गणपतींना निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सात दिवस घरात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या गणरायाला निरोप देताना भाविक भावूक झाले होते. कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने अनेकजण नदीत आतपर्यंत जाऊन विसर्जन करत होते, तर काहींनी नावेने पात्रात जाऊन विसर्जन केले. सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाला नदी घाटावर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. कुटुंबातील सर्वच सदस्य विसर्जनासाठी आल्याने नदीघाट गर्दीने फुलून गेला होता. गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. घाटावर आरत्यांचा गजर आणि अगरबत्ती, धूपमुळे वातावरण सुगंधित झाले होते. बहुतांश शहरवासीयांनी नदीघाटावर गर्दी केली होती, तरीही महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडातही यंदा मोठ्याप्रमाणावर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)
सामाजिक संघटनांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची साद व त्याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याने यंदा निर्माल्य नदीत न टाकता ते कुंडात संकलित केले जात होते. तसेच महापालिकेने शहरात ठिकठिकाणी निर्माण केलेल्या विसर्जन कुंडात मूर्तीच्या विसर्जनासाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. वसंतनगर येथे निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात एका दिवसात चारशेवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: A crowd in Sangli to send a message to Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.