इस्लामपूर शहरात फुसक्या ‘मिसाईल्स’ची गर्दी
By Admin | Updated: April 28, 2016 00:16 IST2016-04-27T22:24:04+5:302016-04-28T00:16:50+5:30
राष्ट्रवादीत कलह : विजयभाऊंसह डावे-उजवे टार्गेट, नगरपालिका निवडणुकीची चर्चा रंगली

इस्लामपूर शहरात फुसक्या ‘मिसाईल्स’ची गर्दी
अशोक पाटील -- इस्लामपूर -आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टा नाका आणि जयहिंद चित्रमंदिर परिसरात चर्चा रंगू लागली आहे. आष्टा नाक्यावर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि त्यांच्या डाव्या-उजव्यांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यातच याच परिसरातील पान शॉप व सायकल दुकानात राष्ट्रवादीच्या फुसक्या ‘मिसाईल्स’ची गर्दी वाढू लागली आहे. त्यांच्याकडून विजयभाऊ पाटील यांनाच लक्ष्य करण्याचा उद्योग सुरू आहे.
दोन-तीन वर्षापासून जयहिंंद चित्रमंदिर परिसर आणि आष्टा नाक्यावरील राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते सकाळी-संध्याकाळी न चुकता हजेरी लावतात. पक्षप्रतोद पाटील सायंकाळी राजारामबापूंच्या पुतळ्यासमोर बसून पालिकेतील राजकीय आडाखे बांधत शहरातील घडामोडींची माहिती ‘डाव्या-उजव्यां’कडून घेत असतात. माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण, माजी नगरसेवक विजय कोळेकर यांची नियमित उपस्थिती असते. साहेबराव कोरे, बाळासाहेब कोरे हे बंधू नेहमीच अवतीभवती असतात. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी नगरसेवक अशोक इदाते, संभाजी कुशिरे यांचीही अधूनमधून उपस्थिती असते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात येथे ये—जा करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
शहराच्या राजकारणात पक्षप्रतोद पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून अॅड. सुधीर पिसे यांचे नाव घेतले जाते. आता पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद चित्रमंदिर परिसरातील एका सायकल दुकानात राजकीय क्षेपणास्त्रांची अर्थात मिसाईल्सची रेलचेल सुरू झाली आहे. त्यात प्रामुख्याने एस. पी. पाटील, विश्वास साळुंखे, विलास ताटे, शंकर पाटील, माणिक गायकवाड, किसन सांडगे, संभाजी पाटील, अशोक पवार यांचा समावेश आहे. आनंदराव मलगुंडे हेही अधून-मधून येथे उपस्थिती लावतात.
पक्षप्रतोद पाटील यांच्या विरोधातील ही मिसाईल्स शहरातील विकासावर न बोलता, पाटील यांच्यावर कुरघोड्या कशा करता येतील, यावर मंथन करताना दिसतात. मात्र याचा कसलाही परिणाम पाटील व त्यांच्या डाव्या-उजव्यांवर झालेला नाही. सकाळी नाष्टा झाल्यानंतर सायंकाळी जेवणाचा बेत आखला जातो. यापलीकडे ही मिसाईल्स काहीही करू शकत नाहीत. परिणामी ती फुसकी ठरत चालल्याची चर्चा आहे.
कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांना याच फुसक्या मिसाईल्सचा पाठिंबा होता. त्यावेळी पक्षप्रतोद पाटील यांचे चुलत बंधू संजय पाटील हेही रिंगणात होते. मात्र केवळ पक्षप्रतोद पाटील यांच्या पाठबळावर संजय पाटील यांचा विजय झाला. यावरूनच पक्षप्रतोद पाटील आणि त्यांच्या डाव्या-उजव्यांना या फुसक्या मिसाईल्सचा धोका नसल्याचे बोलले जात आहे.
संजयभाऊंची तयारी...
आष्टा नाका परिसरात पोलिसपाटील घराण्यातील संजयभाऊ पाटील स्वत:च्या दुकानासमोर बसून राजकीय मंडळींच्या टोप्या उडवत असतात. त्यांनी स्वबळावर पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परंतु त्यांचा निर्णय आमदार जयंत पाटील यांच्या बैठकीनंतर आणि निर्णयानंतरच ठरणार आहे.