सांगलीत सेतू केंद्रात दाखल्यांसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:36+5:302021-02-06T04:46:36+5:30
सांगलीत राजवाड्यातील सेतू केंद्रामध्ये दाखले वेळेत मिळत नसल्याने गुरुवारी दिवसभर अशी झुबंड उडाली होती. वैतागलेल्या महिला दारातच बसकन मारून ...

सांगलीत सेतू केंद्रात दाखल्यांसाठी झुंबड
सांगलीत राजवाड्यातील सेतू केंद्रामध्ये दाखले वेळेत मिळत नसल्याने गुरुवारी दिवसभर अशी झुबंड उडाली होती. वैतागलेल्या महिला दारातच बसकन मारून बसल्या होत्या.
छाया : संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. नियोजनाअभावी नागरिकांना तासनतास ताटकळावे लागत आहे. विविध दाखल्यांसाठी आर्थिक लूटही सुरू आहे.
वरिष्ठांचे नियंत्रण हरविल्याने सेतूमध्ये अनागोंदी सुरू आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रतिज्ञापत्रासाठी गेलेल्या नागरिकांचे काम संध्याकाळी पाच वाजले तरी उरकलेले नव्हते. इंटरनेट बंद असल्याची कारणे सेतूमधून सांगण्यात येत होती. दूरसंचारच्या अधिकाऱ्यांनी हा दावा खोडून काढताना इंटरनेट सुरू असल्याचे सांगितले. या खेळखंडोबाने नागरिकांची मात्र ससेहोलपट झाली. केंद्राबाहेर सकाळपासून झुंबड उडाली होती. लांबच लांब व बेशिस्त रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. वैतागलेल्या महिला केंद्राबाहेरच बसकन मारून बसल्या होत्या.
गरजवंतांचा गैरफायदा उठवत सेतूमध्ये दाखल्यांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जात असल्याचेही आढळले. दहा-पंधरा रुपयांच्या दाखल्यांसाठी चाळीस रुपये घेतले जात आहेत. इतक्या रकमेची पावती मागूनही दिली जात नाही. कामे लवकर उरकण्यासाठी नागरीकही नाइलाजास्तव पैसे देतात. केंद्राचे संपूर्ण कामकाज एजंटांनी हायजॅक केले आहे.
चौकट
दोन रुपयांचा फॉर्म दहा रुपयांना
विविध दाखले, प्रतिज्ञापत्रांचे फॉर्मची विक्री सेतू केंद्राबाहेर सुरू असते. दोन रुपयांच्या फॉर्मसाठी दहा ते वीस रुपये घेतले जातात. नागरिकांची अशा प्रकारे लूट सुरू असतानाही वरिष्ठांचे त्याकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे अप्पर तहसीलचे अधिकारी हाकेच्या अंतरावर असतानाही त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही.
-----------