महापालिका स्थायी समिती सदस्यासाठी भाजपमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:07+5:302021-08-14T04:32:07+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीच्या नऊ सदस्यांची २० रोजी निवड होणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. आठ ते ...

महापालिका स्थायी समिती सदस्यासाठी भाजपमध्ये गर्दी
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीच्या नऊ सदस्यांची २० रोजी निवड होणार आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. आठ ते दहा नगरसेवकांनी संधी देण्याची मागणी बैठकीत केल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. सोमवारनंतर नेत्यांकडे इच्छुकांची यादी सादर करुन चर्चा केली जाईल, असे भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे तर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या २० रोजीच्या महासभेत नऊ नव्या सदस्यांची निवड होणार आहे. भाजपकडून ४, काँग्रेस २ व राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांची निवड होईल.
भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजपमधील इच्छुकांनी संधी देण्याची मागणी केली. कल्पना कोळेकर, सुब्राव मद्रासी, गणेश माळी, सोनाली सागरे, नसीमा शेख, गजानन आलदर, उर्मिला बेलवलकर, गीताजंली ढोपे-पाटील यांच्यासह दहा ते बारा नगरसेवक इच्छुक आहेत. इच्छुकांना पक्षाकडे अर्ज करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. इच्छुकांचे अर्ज नेत्यांकडे सादर केले जातील. त्यानंतर नेत्यांशी चर्चा करून सदस्यांची नावे अंतिम होतील, असे सिंहासने यांनी सांगितले.
चौकट
काँग्रेस अडकली एका जागेवर
महापौर निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीची एक जागा काँग्रेसला देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोरच ही चर्चा झाली होती. त्यामुळे स्थायी समितीत काँग्रेसला एक जादा जागा द्यावी, अशी मागणी उपमहापौर उमेश पाटील यांनी केली आहे.