जिल्ह्यात वादळामुळे कोट्यवधीचे नुकसान

By Admin | Updated: May 20, 2016 23:39 IST2016-05-20T23:16:19+5:302016-05-20T23:39:24+5:30

शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यात घरांची पडझड; केळीच्या बागा जमीनदोस्त

Crores of losses due to the storm in the district | जिल्ह्यात वादळामुळे कोट्यवधीचे नुकसान

जिल्ह्यात वादळामुळे कोट्यवधीचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने जत, आटपाडी, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळसह मिरज पूर्व भागाला झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. घरांच्या पडझडीसह केळीच्या बागा, पानमळे जमीनदोस्त झाले. जनावरांच्या मृत्यूसह अनेक दुर्घटनाही घडल्या. विजेच्या तारा तुटून अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शुक्रवारी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत तारा व खांब तुटल्यामुळे त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.


शिराळा : शिराळा खुर्द (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या पाण्यात सोडलेल्या विद्युत मोटारीच्या तारेमधून पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने दादू ज्ञानू नांगरे यांची एक गाय व म्हैस विजेच्या धक्क्याने दगावली. या जनावरांचे मालक दादू नांगरे व त्यांच्या पत्नी जिजाबाई नांगरे यांनाही विजेचा धक्का बसला आहे. सुदैवाने हे दोघे यातून बचावले. यामध्ये दादू नांगरे यांचे एक लाखाचे नुकसान झाले.
शिराळा खुर्द येथे वारणा नदीकाठी नांगरे टेक नावाचे शेत आहे. येथे अनेक विद्युत मोटारी आहेत. येथे जयसिंग केशव पाटील यांची पाण्यात विद्युत मोटार आहे. दुपारी तीनच्या सुमाास दादू नांगरे व जिजाबाई नांगरे गाय व म्हैशीला पाण्यावर घेऊन आले. यावेळी पाण्याजवळ विद्युत मोटारीच्या जोड असलेल्या तारेमधून विद्युतप्रवाह नदीच्या पाण्यात उतरला होता. प्रथम गाय पाण्यात शिरताच तिला विजेचा प्रचंड धक्का लागून ती पाण्यातच मृत्यमुखी पडली. पाठोपाठ म्हैसही पाण्यात गेली. म्हैशीलाही विजेचा धक्का बसून तीही दगावली. यावेळी पाठोपाठ आलेल्या जिजाबाई यांनाही विद्युत वायरचा धक्का बसल्याने त्याही पाण्याबाहेर पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले दादू नांगरे यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेचा पंचनामा केला आहे.
ढालगाव : ढालगावसह परिसरातील घरांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बदल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तर कौलारु घरांचे छत, पत्र्याच्या घरांचे छत, वैरणीच्या गंजी, पान टपऱ्या उडून गेल्या आहेत. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्याने अठरा तास वीजपुरवठा खंडित झाला होता, तर विजापूर -गुहागर राज्यमार्गावर झाडे कोसळल्याने २४ तास वाहतूक बंद होती. तीन महिलांसह एक जखमी झाला. चोरोची येथील जया कांबळे (वय २२) यांच्या डोक्यात घराची वीट पडून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. (वार्ताहर)

सद्गुरु कारखाना : ९५ लाखांची हानी
आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे बुधवार, दि. १८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने ९५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हा साखर कारखाना सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. बुधवारी सायंकाळी जोराचे वादळी वारे आले. त्यामुळे साखर कारखान्यातील अनेक यंत्रसामग्रीसह पत्रे, भिंत पडून मोठे नुकसान झाले. साखर भरली जाते, त्या विभागातील रॉड, ३० मीटर स्ट्रक्चर कॉलम, सहा मीटर उंच व २१ मीटर लांबीची सिमेंट भिंत पडली. २०० प्रिकोटेड पत्रे छतावरून उडून गेले. स्वयंचलित वजन करणारे यंत्र मोडले. साखर वाहून नेणारा बेल्ट तुटला. २ टन रेलिंग पाईप तुटली. साखर पोती वाहून नेणारे बेल्ट तुटले. मोलॅसिसची टाकी फुटली. तिथली कुंपणाची भिंत पडली. एटीपी प्लॅँट इमारतीवरील पत्रे उडून गेले. कारखान्याच्या व्यवस्थापनाने या वादळी वाऱ्यामुळे कारखान्याचे १ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मात्र महसूल प्रशासनाने ९५ लाख रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी तहसीलदार अजितसिंह पाटील, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Crores of losses due to the storm in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.