‘सिव्हिल’च्या निधीची कोटींची उड्डाणे; आव्हाने कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:27+5:302021-03-13T04:47:27+5:30
सांगली : दक्षिण महाराष्ट्र व शेजारच्या कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांना सांगलीचे शासकीय रुग्णालय नेहमीच दिलासादायक ठरले आहे. रोजचा साडेचारशे रुग्णांचा ...

‘सिव्हिल’च्या निधीची कोटींची उड्डाणे; आव्हाने कायमच
सांगली : दक्षिण महाराष्ट्र व शेजारच्या कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांना सांगलीचे शासकीय रुग्णालय नेहमीच दिलासादायक ठरले आहे. रोजचा साडेचारशे रुग्णांचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि अन्य विभागातील ताण लक्षात घेऊन स्वतंत्र महिला रुग्णालयासह इतर सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. निधी प्रत्यक्षात येईल, तेव्हा कामाला मुहूर्त लागणार असला तरी प्रत्यक्षात रूग्णालयातील मूलभूत सुविधा पुरविण्याकडे कधी लक्ष दिले जाणार, हा सवाल कायम आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयातील वाढीव कामासाठी राज्य शासनाने ९२ कोटींचा निधी मंजूर केला. नवीन ओपीडीसह नवीन महिला व शिशू रुग्णालयासाठीही निधी देण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असली तरी रुग्णालयाच्या महत्त्वाच्या सोयी पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे सध्याच्या रुग्णालयासह नव्याने प्रस्तावित रुग्णालयातही रुग्ण, प्रशासन, आरोग्य पुरविणाऱ्या यंत्रणांच्या सोयीचा विचार झाल्यास निधीचा खऱ्या अर्थाने सदुपयोग होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती ३४ एकराहून अधिक क्षेत्र रुग्णालयाचे आहे. त्यातील केवळ १० ते १५ एकर क्षेत्रच वापरात आहे. रुग्णालयाच्या दक्षिणेकडील भाग आजही दुर्लक्षित असून मुख्य इमारतीला लागूनच ‘अत्यावश्यक सेवां’साठीची इमारत, नवीन ओपीडीसाठीची इमारत उभारण्यात आली आहे. रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या छोट्या-छोट्या इमारतीमधून आरोग्य विभागाचे कामकाज सध्या सुरू आहे. वस्तुत: आरोग्य विभागाच्या कामकाजासाठी सुसज्ज इमारतीची आवश्यकता असताना अद्यापही ती अपूर्णच आहे.
चौकट
राष्ट्रीय आरोग्य अभियानासह जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, हिवताप कार्यालयांचे कामकाज रुग्णालय परिसरातील वेगवेगळ्या इमारतींमधून चालते. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासाठीही स्वतंत्र सोय अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे साध्या फिटनेस दाखल्यासाठी आलेल्या नागरिकाला पायपीट करावी लागते. नवीन ओपीडी इमारतीचा वापर सुरू झाला असलातरी अद्यापही मुख्य दरवाजा बंद आहे. यासह अनेक सुविधा सुरू करणे रुग्णांसह प्रभावी आरोग्य सुविधांसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.
कोट
शासकीय रुग्णालयाच्या विस्तारासाठी निधी मिळाल्याने दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात उपयोगी काम व्हायला हवे. केवळ रुग्णालयांच्या इमारती उभारण्यापेक्षा तिथे दाखल होणाऱ्या रुग्णांचाही विचार करून सुविधा पुरविल्यास त्याचा उपयोग होणार आहे. वाढती लोकसंख्या व रुग्णालयात वाढत असलेल्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
सतीश साखळकर, सर्वपक्षीय कृती समिती