चोपडेवाडी येथील महिलेवर मगरीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:48+5:302021-05-08T04:26:48+5:30

भिलवडी : चोपडेवाडी (ता. पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसंगावधान ...

Crocodile attack on a woman in Chopdewadi | चोपडेवाडी येथील महिलेवर मगरीचा हल्ला

चोपडेवाडी येथील महिलेवर मगरीचा हल्ला

भिलवडी : चोपडेवाडी (ता. पलूस) येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात नम्रता मारुती मोरे (वय ३१) ही महिला जखमी झाली. प्रसंगावधान दाखविल्याने ती मगरीच्या तावडीतून बचावली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

चोपडेवाडी येथील कृष्णा नदीकाठाच्या गावपाणवठ्यावर नम्रता मोरे या दाेन महिलांसह धुणे धुत होत्या. पाठीमागून पाण्यातून आलेल्या मगरीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या उजव्या दंडाला जबड्यात पकडून पाण्यात खेचायला सुरुवात केली. नम्रता यांनी आरडाओरडा करीत हाताला जोराने हिसडा दिला. यामुळे मगरीने जबडा उघडला. मगरीच्या तोंडातून हात सुटल्याने नम्रता पाणवठ्यावर पळत आल्या.

सावधगिरी व धाडसामुळे मगरीच्या तावडीतून त्यांचा जीव वाचला. मगरीचे दात दंडात घुसल्याने हाताला दुखापत होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

या वर्षात मगरीने प्रथमच कृष्णा नदीकाठावरील लोकांची वर्दळ असणाऱ्या पाणवठ्यावर हल्ला केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून हाेत आहे.

फोटो : ०७ नम्रता मोरे

Web Title: Crocodile attack on a woman in Chopdewadi