मिरजेत दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर...

By Admin | Updated: November 23, 2014 00:45 IST2014-11-23T00:45:35+5:302014-11-23T00:45:35+5:30

नागरिकांचे बळी : महापालिका यंत्रणा कोलमडली, आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे

Critical water crisis is critical ... | मिरजेत दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर...

मिरजेत दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर...

मिरज : मिरज शहरातील दूषित पाणीपुरवठ्याचा व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाल्याने शहरात गॅस्ट्रो, कॉलरा व डेंग्यूच्या साथीने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. भरलेल्या कचरा कुंड्या, ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी व शहरातील अवैध कत्तलखान्यांमुळे नागरिकांचे बळी जात असताना, महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन करीत आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ आटोक्यात येत नसल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत.
मिरजेत पाणी पुरवठा वाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्याने गळती होऊन सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. गेले दोन आठवडे शहरातील विविध भागात दूषित पाणी पुरवठा होत असताना पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाला दूषित पाण्याची गळती सापडलेली नाही. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.
रस्त्याकडेला साचलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील अस्वच्छता नागरिकांच्या जिवावर बेतत असताना, महापालिका आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. अपुरे कर्मचारी व कामचुकार अधिकारी असल्याने शहरातील कचरा वेळीच उचलण्यात येत नाही. तुंबलेल्या ड्रेनेज वाहिन्यांची स्वच्छता करून सांडपाणी रस्त्यांवर व सखल भागात साचणार नाही, याची उपाययोजना करण्यात आलेली नाही. नियमित स्वच्छता केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहरात रहिवासी परिसरात अवैध कत्तलखान्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. मोकाट व भटक्या कुत्र्यांचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व कॉलऱ्याच्या साथीने दररोज बळी जात आहेत. शेकडो रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नागरिकांनी तक्रार केल्यांनतर तात्पुरती स्वच्छता केली जाते. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी अधिकारीच कार्यालयात हजर नसतात. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा बळी गेल्याने महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जैलाब शेख यांनी केली.
पन्नास वर्षांपूर्वीच्या यंत्रणेवर पाणीपुरवठ्याची यंत्रणा
अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला असताना, महापालिका आरोग्य विभागाला केव्हा जाग येणार, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या सुमारे ५० वर्षे जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा मोठा ताण आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना गेली पंधरा वर्षे रखडल्याने दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे वारंवार साथीचे आजार उद्भवत आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने शहरातील वारंवार तुंबणारे ड्रेनेज व स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक ठरले आहे.
 

Web Title: Critical water crisis is critical ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.