फाईल गहाळप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी
By Admin | Updated: April 30, 2015 00:23 IST2015-04-29T23:30:54+5:302015-04-30T00:23:35+5:30
विवेक कुलकर्णी : न्यायालयाचे आदेश

फाईल गहाळप्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारी
सांगली : विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या आरक्षित जागेसंदर्भातील फाईल गहाळ झाल्याप्रकरणी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती संस्थेचे सल्लागार अॅड. विवेक कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
कुलकर्णी म्हणाले, स्वा. सावरकर प्रतिष्ठान संस्थेस शैक्षणिक कामाबाबत आरक्षित असलेली सिटी सर्व्हे क्र. ३६३/२ ब मधील जागा १९८७ मध्ये कब्जेपट्टी करून दिलेली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने ही जागा शैक्षणिक संस्थेस गुणवत्तेवर द्यावी, असा निकाल दिला होता. परंतु तत्कालीन राज्य शासनाने ही जागा मूळ मालकास परत केली. यासंदर्भात ५ सप्टेंबर २००८ रोजी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता, मंत्रालयातील नागरी विकास खात्याच्या माहिती अधिकाऱ्यांनी यासंंबंधीची फाईल उपलब्ध नसल्याचे कळविले होते. या निर्णयावर पुन्हा १५ जून २००९ रोजी माहिती आयुक्तांकडे अपील केले असता, त्यांनी १८ आॅगस्ट २०११ रोजी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. परंतु याची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयात २२ जुलै २०१२ रोजी रिट अर्ज दाखल करण्यात आलेला होता.
उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय ओक आणि ए. एस. गडकरी यांंच्या खंडपीठाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, उपायुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सहा महिन्यात तपास पूर्ण करावा, असा आदेश दिला असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कब्जेपट्टीने जागा दिली
स्वा. सावरकर प्रतिष्ठान संस्थेस आरक्षित असलेली सिटी सर्व्हे क्र. ३६३/२ ब मधील जागा १९८७ मध्ये कब्जेपट्टी करून दिलेली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थेस गुणवत्तेवर जागा द्यावी, असा निकाल दिला होता.