पोलिसांपासून बचावासाठी गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:04+5:302021-08-23T04:29:04+5:30
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांपासून बचावासाठी गुन्हेगाराने सुरुवातीला इमारतीवरुन उडी मारली व ...

पोलिसांपासून बचावासाठी गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगली : पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांपासून बचावासाठी गुन्हेगाराने सुरुवातीला इमारतीवरुन उडी मारली व त्यानंतर स्वत:वरच ब्लेडने वार केल्याची घटना घडली.
शहरातील वाल्मीकी आवासमध्ये शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी रेकार्डवरील गुन्हेगार रोहित मधुकर गोसावी (रा. वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांच्या रेकाॅर्डवरील रोहित गोसावी याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक वाल्मीकी आवासमध्ये गेले होते. पोलीस आपल्याला पकडण्यास आलेे याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्याने त्याने हातात असलेल्या ब्लेडने स्वत:च्या मानेवर व हाताच्या दंडावर जखमा करून घेतल्या. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्यास तातडीने रोखत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रेकॉर्डवरील असतानाही पोलिसांपासून बचावासाठी असे कृत्य केल्याने त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी दीपक सदाशिव गट्टे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.