न्यायालयासमोर फिर्यादीवर हल्ला
By Admin | Updated: March 28, 2017 00:15 IST2017-03-28T00:15:03+5:302017-03-28T00:15:03+5:30
सांगलीतील घटना : दोन्ही गटांकडून दगडफेक; पोलिसांचा लाठीमार

न्यायालयासमोर फिर्यादीवर हल्ला
सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावर झालेल्या इम्रान मुल्ला याच्या खुनात फिर्यादी असलेला त्याचा सख्खा भाऊ इरफान अजिज मुल्ला (वय ३४, रा. कडलास्कर चाळ, मटण मार्केट, सांगली) याच्यावर न्यायालय आवारात चाकू हल्ला झाला.
सोमवारी दुपारी दीड ते दोन यादरम्यान ही थरारक घटना घडली. घटनेनंतर मुल्लाचे नातेवाईक व हल्लेखोरांनी एकमेकांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. हल्ल्यात जखमी झालेल्या इरफान मुल्ला यास उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या पाठीत तीन, तर उजव्या दंडावर चाकूचे घाव आहेत. त्याच्यावर हल्ला झाल्याचे समजताच रुग्णालयात दिवसभर गर्दी होती. न्यायालयाच्या आवारातही तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. हा हल्ला इम्रानचा खून करणाऱ्या संशयितांनी केला असल्याचा आरोप जखमी इरफानने केला आहे. त्यानुसार त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून २२ नोव्हेंबर २०१४ रोजी इम्रान मुल्ला याचा शंभरफुटी रस्त्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. यातील चार संशयित सध्या जामिनावर बाहेर आहेत. अब्दुल पठाण व युसूफखान पठाण अटकेत आहेत. जिल्हा व सत्रन्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरु राहणार आहे. सोमवारी संशयितांविरुद्ध खुनाचे आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी होती. यासाठी पोलिसांनी अटकेतील संशयित अब्दुल पठाण व युसूफखान पठाण यांना जिल्हा कारागृहातून न्यायालयात आणले होते. अन्य चार संशयितही आले होते. तसेच इम्रानचा भाऊ इरफान व अन्य नातेवाईकही आले होते.
दोन्ही गट न्यायालय आवारातील एका हॉटेलमध्ये चहा घेत होते. तिथे एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. पण हे प्रकरण तिथेच मिटले होते. दुपारी दीडच्या सुमारास इरफान मुल्ला न्यायालयात जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर पाठीत तीन वेळा चाकूने हल्ला केला. चौथा हल्ला त्याच्या मानेवर होणार; तेवढ्यात त्याने उजवा हात वर केल्याने चाकूचा घाव त्याच्या दंडावर बसला. अनपेक्षित घडलेल्या या घटनेनंतर न्यायालय आवारात साऱ्यांची पळापळ सुरू झाली. इरफानवर हल्ला झाल्याचे समजताच त्याचे नातेवाईक आले. त्यामुळे हल्लखोर व त्यांच्यात पुन्हा मारामारी सुरू झाली. दोन्ही गटाने एकमेकांवर दगड व विटा भिरकावल्या. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर दोन्ही गटांची पांगापांग झाली. (प्रतिनिधी)