अंत्यसंस्कारासाठी पैसे मागणाऱ्यावर फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:02+5:302021-06-10T04:19:02+5:30
सांगली : कोरोना आजाराने मृत्यू झाल्यानंतर अत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी कारणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ...

अंत्यसंस्कारासाठी पैसे मागणाऱ्यावर फौजदारी कारवाई
सांगली : कोरोना आजाराने मृत्यू झाल्यानंतर अत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी कारणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी चांगलाच दणका दिला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून सहा हजार रुपये घेतल्याचे समोर आल्यानंतर संबंधित कर्मचारी गौरव सदाशिव सूर्यवंशी याच्याविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश गुडेवार यांनी दिले आहेत.
कोरोनात मृत्यू झाल्यानंतर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. यासाठी नातेवाइकांकडून पैशांची मागणी केली जाते. यापूर्वीही अशा घटना उघडकीस आल्या होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून त्याठिकाणी अत्यसंस्कारासाठी पैसे घेतले जात नसल्याचा फलक लावण्यात आला. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांची लूट थोड्याप्रमाणात थांबली. दरम्यान, सांगलीतील एक रुग्ण मिरजेतील क्रीडा संकुल येथे उपचारासाठी दाखल झाले. काल सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर अत्यसंस्कारासाठी संबंधितांकडून नातेवाइकांना फोन करण्यात आला. अत्यसंस्कारासाठी सहा हजारांची मागणी करण्यात आली. हा सारा प्रकार चंद्रकांत गुडेवार यांच्यासमोर आला. त्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी तत्काळ मिरजेतील क्रीडा संकुल येथे धाव घेतली. संबंधित व्यक्ती बोलावून घेत चौकशी केली. त्यात पैशांची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात आली. संबंधित ठेकेदारांनाही समज देण्यात आली. कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक संतोष वीर यांना गुडेवार यांनी दिले आहेत.
चौकट
टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची गय नाही : चंद्रकांत गुडेवार
मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अत्यसंस्कारासाठी पैसे देण्याची गरज नाही. जर एखादा कर्मचारी पैशाची मागणी करत असेल, तर नागरिकांनी तक्रार करावी. संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच संबंधित ठेकेदारावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दिला आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद