विट्यात आणखी दोन मुकादमांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:27+5:302021-01-03T04:28:27+5:30

विटा : ऊसतोड मजूर देण्याचे आमिष दाखवून खानापूर व कडेगाव तालुक्यांतील तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना २७ लाख २५ हजार ...

Crime on two more lawsuits in Vita | विट्यात आणखी दोन मुकादमांवर गुन्हा

विट्यात आणखी दोन मुकादमांवर गुन्हा

विटा : ऊसतोड मजूर देण्याचे आमिष दाखवून खानापूर व कडेगाव तालुक्यांतील तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना २७ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी आणखी दोन ऊस वाहतूक ठेकेदारांची दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विकास अमरसिंग चव्हाण (रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) व बाळू श्रीराम राठोड (रा. मारवाडी-खुर्द, पो. रोहडा, ता. पुसद, जि. यवतमाळ) या दोन ठकसेन मुकादमांविरुद्ध शनिवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सावंता परसू माळी (वय ६०, रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) व पतंगराव गणपती महाडिक (४३, रा. नेवरी) या दोघांनी विटा पोलिसांत तक्रार दिली आहे.

वडियेरायबाग येथील सावंता माळी व नेवरी येथील पतंगराव महाडिक हे दोघे ट्रॅक्टरद्वारे साखर कारखान्याला ऊस वाहतुक करतात. त्यासाठी माळी यांना २० ऊसतोड मजुरांची आवश्यकता होती. संशयित मुकादम बाळू राठोड याने मजूर देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे माळी यांनी राठोड यास रोख पाच लाख रुपये दिले.

तसेच नेवरी येथील ऊस वाहतूक ठेकेदार पतंगराव महाडिक यांनाही संशयित मुकादम विकास चव्हाण याने २७ ऊसतोड मजूर देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडूनही रोख पाच लाख रुपये घेतले. परंतु या दोन्ही ऊस वाहतूक ठेकेदारांना मजूर न देता त्यांची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ठकसेन संशयित मुकादम बाळू राठोड व विकास चव्हाण या दोघांविरुद्ध शनिवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून खानापूर व कडेगाव तालुक्यांतील तीन ऊसतोड वाहतूक ठेकेदारांना २७ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतानाच शनिवारी पुन्हा कडेगाव तालुक्यातील आणखी दोन ऊस वाहतूक ठेकेदारांची दहा लाखांची फसवणूक झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Web Title: Crime on two more lawsuits in Vita