गायकवाडसह तिघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: December 1, 2014 00:13 IST2014-11-30T22:23:25+5:302014-12-01T00:13:15+5:30
पत्नीची फिर्याद : बदली कर्मचारी आत्महत्या प्रकरण

गायकवाडसह तिघांविरुद्ध गुन्हा
सांगली : महापालिकेतील बदली कर्मचारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बदली कर्मचारी संघटनेचे सचिव सुभाष वाघमारे यांच्या आत्महत्येप्रकरणी सोलापुरातील कामगार नेता श्रीशैल गायकवाडसह तिघांविरुद्ध अखेर आज, रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र कांबळे (रा. सांगलीवाडी) व सुब्राव मोहिते (शांतिनगर, सांगली) अशी अन्य दोघांची नावे आहेत. वाघमारे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेतील बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी वाघमारे यांचे प्रयत्न सुरू होते. ते स्वत: बदली कर्मचारी असल्याने हा प्रश्न मार्गी लागावा, अशी त्यांची तळमळ होती. या प्रश्नावर त्यांनी कामगारांना संघटित करून सांगलीसह मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. दरम्यानच्या काळात त्यांची सोलापूरचा कामगार नेता श्रीशैल गायकवाड याच्याशी भेट झाली. गायकवाड याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर वाघमारे यांनी विश्वास ठेवला. यातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बदली कर्मचारी संघटनेची स्थापना केली. संघटनेचे सचिवपद त्यांच्याकडे आले होते. गायकवाड याने वाघमारे यांना प्रत्येक कर्मचाऱ्याकडून सुरुवातीला तीन हजार रुपये व त्यानंतर दहा हजार रुपये वर्गणी स्वरुपात गोळा करण्यास सांगितले. त्यानुसार वाघमारे यांनी ही वर्गणी गोळा केली होती. वर्गणीची ही रक्कम ६० लाखांच्या घरात गेली होती.
वर्गणी देऊनही वाघमारे यांच्याकडून काम झाले नव्हते. यामुळे कर्मचाऱ्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. वर्गणीची रक्कम गायकवाडने घेतली होती, याबाबत वाघमारे यांनी ही चिठ्ठी पोलिसांच्या स्वाधीन केली होती. (प्रतिनिधी)
पोलीस जागे झाले
लक्ष्मी वाघमारे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन, त्यांच्या पतीला गायकवाडसह महेंद्र कांबळे व सुब्राव मोहिते यांनी कशाप्रकार फसविले आहे, याचा उलगडा केला होता. यानंतर शहर पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी लक्ष्मी वाघमारे यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला.