जतचे नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:30+5:302021-02-05T07:17:30+5:30

जत : जत येथे एकास मारहाण करून मोटार अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक ...

Crime against Jat corporator Umesh Sawant | जतचे नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर गुन्हा

जतचे नगरसेवक उमेश सावंत यांच्यावर गुन्हा

जत : जत येथे एकास मारहाण करून मोटार अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजू सदाशिव साळुंखे (वय ३१, रा. कोळीगिरी, ता. जत) यांनी मंगळवारी (दि. २) रात्री उशिरा जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

उमेश सावंत यांच्याकडे राजू साळुंखे हा टिपरचालक म्हणून काम करीत होता. मागील काही दिवसांपासून त्याने त्यांच्याकडील काम सोडले आहे. मंगळवारी दुपारी साळुंखे व सावंत यांच्यात प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात याच कारणावरून शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली. त्यानंतर एकमेकाला धरून ते पोलीस ठाण्याच्या स्वागत कमानीजवळ आले. यावेळी उमेश सावंत तेथून पाठीमागे गेला.

त्यानंतर मोटारीमध्ये (एमएच १०, सीए ४८४८) बसून ती साळुंखे यांच्या अंगावर घालून त्यांना त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी तेथे उपस्थित होते. त्यांनाही तेथून पळून बाजूला जावे लागले होते.

गाडीची धडक साळुंखे यांनी चुकविली. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरातील पार्किंग बोर्ड लावलेला एक लोखंडी अँगल वाकला आहे. या घटनेची चौकशी करून रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Crime against Jat corporator Umesh Sawant