वाळेखिंडी सरपंचांसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:53+5:302021-01-13T05:08:53+5:30
जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील सरपंच माधवी विजय पाटील (वय ३६) यांच्यासह पाच जणांच्या विरोधात जत पोलिसात ...

वाळेखिंडी सरपंचांसह पाच जणांवर गुन्हा
जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील सरपंच माधवी विजय पाटील (वय ३६) यांच्यासह पाच जणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची जाऊबाई सुप्रिया अजय पाटील (वय ३०) यांना मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुप्रिया पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
सुप्रिया पाटील व अजय तानाजी पाटील ( वय ३५ ) यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना आठ व सहा वर्षांची दोन मुले आहेत. लग्नानंतर पती अजय पाटील, सासरा तानाजी भाऊसाहेब पाटील ( ५५ ), सासू छाया तानाजी पाटील ( ५० ), दीर विजय तानाजी पाटील (४५) व जाऊबाई आणि सरपंच माधवी विजय पाटील यांनी घरगुती कारणावरून सुप्रिया यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. तसेच माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी त्रास दिला जात होता.
अजय पाटील व तानाजी पाटील हे हैद्राबाद येथे ज्वेलरी व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. सुप्रिया या शेतीवाडी व घरदार सांभाळून वाळेखिंडी येथे मुलासमवेत राहात आहेत.
सुप्रिया यांना एकटेच वाळेखिंडी येथे सोडून दोन्ही मुलांना घेऊन अजय पाटील व तानाजी पाटील हैद्राबाद येथे चार दिवसांपूर्वी जात होते. मुलांना घेऊन जाताना सुप्रिया पाटील यांनी विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण केली. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुप्रिया पाटील यांनी पाच जणांविरोधात शनिवारी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.