कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी जतच्या गटविकास अधिकाºयावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:13 IST2019-04-16T00:13:53+5:302019-04-16T00:13:58+5:30
जत : जत पंचायत समिती प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे ...

कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी जतच्या गटविकास अधिकाºयावर गुन्हा
जत : जत पंचायत समिती प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक दीपक सोनाजी बर्गे (वय ३८) यांनी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या आरोपावरून वाघमळे यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमळे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत दीपक यांचे वडील सोनाजी शामराव बर्गे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दीपक बर्गे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त करून त्याचा पंचनामा केला होता. गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या त्रासाला व सतत होणाºया मानहानीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. त्यानंतर बर्गे यांच्या मृत्यूस कारणीभूत धरून त्यांच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा व वरिष्ठांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दीपक यांचे वडील सोनाजी शामराव बर्गे (६०, रा. आमदरी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत्त यांना दिले होते. पत्नी १५ मार्च रोजी नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी गावी आमदरी येथे गेल्यामुळे दीपक हे जत पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानात
एकटे राहत होते. लोकसभा निवडणुकीसाठी नेमणूक असल्यामुळे त्यांना गावी जाता आले नव्हते. गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे या दीपक यांना दैनंदिन कामात सतत त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत होत्या. त्यांचा मानसिक छळ केला जात होता. सतत होणाºया त्रासाला व अपमानास्पद वागणुकीस कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
एखादे काम केल्यानंतर ते चुकीचे झाले असेल, तर समजावून सांगण्याऐवजी जातीवाचक बोलून दीपक याचा वाघमळे यांच्याकडून अपमान केला जात होता. त्यांच्या मृत्यूस गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे याच सर्वस्वी जबाबदार आहेत. दीपक माझ्या कुटुंबातील कर्ता व कमावता माणूस होता. घरात इतर कोणी कमावते नाही. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे त्याची मुले, पत्नी व आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे वाघमळे यांच्याविरोधात कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सोनाजी बर्गे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल माने करत आहेत.