इस्लामपुरात मोर्चा काढल्याबद्दल राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:34+5:302021-08-25T04:32:34+5:30
इस्लामपूर : कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जमाव टाळण्यासाठी नियोजित मोर्चा रद्द करून सनदशीर मार्गाचा ...

इस्लामपुरात मोर्चा काढल्याबद्दल राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
इस्लामपूर : कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जमाव टाळण्यासाठी नियोजित मोर्चा रद्द करून सनदशीर मार्गाचा अवलंब करावा यासाठी सीआरपीसी कलम १४९ नुसार बजावलेल्या नोटिसीचा भंग केला म्हणून माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक बाजीराव बाबूराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये वरील तिघांसह सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे, शाकिर इसालाल तांबोळी, सूर्यकांत ऊर्फ पोपट तुकाराम मोरे, प्रसाद उत्तमराव पाटील व इतर ३५० ते ४०० जणांविरुद्ध कलम १८८, २६९, ३४ सह साथ रोगाचे अधिनियम कलम २, ३ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१, महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० चे कलम ११ अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांकरिता माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रित करण्याकरिता जारी केलेल्या उपाययोजनांचा भंग केला म्हणून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.