शेतकऱ्यांना अखंडित विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:38+5:302021-02-05T07:30:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज ...

Creation of solar power project for uninterrupted power supply to farmers | शेतकऱ्यांना अखंडित विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती

शेतकऱ्यांना अखंडित विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण जाहीर करण्यात आले आहे. बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणीही करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पाेलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू होणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८० हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ४७३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत पीक कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील २७ हजार ५५० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १३६ कोटी ८१ लाख रुपये रक्कम वर्ग करून पूरबाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात असली तरी, नागरिकांनी अजूनही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सध्या लसीकरण सुरू असले तरी अद्यापही कोरोना संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

चाैकट

पूरबाधितांना शासनाचा दिलासा

पालकमंत्री पाटील म्हणाले, जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमध्ये शेती, गोठा, घरांसह इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. यासाठी २६ कोटी १० लाख ६८ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. त्यापैकी शेतीपिकाची २३ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ४९ हजार ७२० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीतील शेतीपिके नुकसानीसाठी २६ कोटी ६० लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

चाैकट

लक्षवेधी संचलन

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक विभाग, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वानपथक, जेलकैदी पथक वाहन, बाँबशोधक पथक, निर्भया पथकाने संचलन सादर केले. त्यास उपस्थितांनी दाद दिली.

Web Title: Creation of solar power project for uninterrupted power supply to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.