क्रेन-दुचाकीची टक्कर; दोन ठार
By Admin | Updated: June 6, 2014 00:28 IST2014-06-06T00:27:49+5:302014-06-06T00:28:19+5:30
मृत पळशीचे : क्रेन २० फूट खड्ड्यात उलटली

क्रेन-दुचाकीची टक्कर; दोन ठार
खानापूर : खानापूरपासून दहा किलोमीटरवरील पळशी गावाजवळ क्रेन व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना आज, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रकाश गोविंद जाधव (वय ६०) व सदाशिव रामचंद्र जाधव (७८, दोघेही रा. पळशी, ता. खानापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
गुहागर - विजापूर राज्यमार्गावर पळशी गावाजवळ रस्ता तीव्र वळणांचा आहे. प्रकाश जाधव व सदाशिव जाधव भिवघाटहून पळशीकडे निघाले होते. प्रकाश यांचे घर पळशी गावाबाहेर असून ते सदाशिव यांना गावात सोडण्यास निघाले होते. जुन्या बसस्थानकाच्या पूर्वेस दाट झाडी, तीव्र वळणे, उताराचा रस्ता येथे त्यांची दुचाकी (एमएच १०टी ६०८५) आली असता नागजहून भिवघाटाकडे निघालेली पवनचक्की उभी करणारी मोठी क्रेन (आरजे ०४ ईए ००९३) समोरून आली. त्यावेळी क्रेनने दुचाकीला जोरदार धडक दिली.
क्रेनने या दोघांना दुचाकीसह २०० फूट फरफटत नेले. दोघांच्या अंगावरून जाऊन ती २० फूट खड्ड्यात कोसळली. या अपघातात प्रकाश जाधव यांच्या शरीराचे तीन तुकडे झाले, तर सदाशिव जाधव क्रेनखाली पूर्णपणे दबले गेले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर क्रेनचा चालक व क्लिनरने पलायन केले. पळशी, हिवरे, भिवघाट येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातस्थळी मृतांचे मोबाईल, चप्पल, दुचाकीचे तुकडे पडले होते. दुचाकी चक्काचूर झाली. क्रेन २० फूट खड्ड्यात पलटी झाली होती. खानापूर पोलीस औट पोस्टच्या कर्मचार्यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा पळशी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाश जाधव सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक होते, तर सदाशिव जाधव माजी सैनिक होते. प्रकाश जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत. तर सदाशिव जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.
या अपघाताचे ठिकाण तीव्र वळण, उतार, दाट झाडी अशा स्वरूपाचे असल्याने समोरून येणारे वाहन एकमेकाला दिसत नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूस हाच रस्ता कारणीभूत ठरला. क्रेनच्या चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. चालकाचा ताबा सुटल्याने या दोघांना फरफटत नेत क्रेनही खड्ड््यात पडली. (वार्ताहर)