तासगाव तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव नगरपालिकेने पुढाकार घेऊन पुन्हा कोविड सेंटर सुरू केले आहे. येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत ते सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
तासगाव तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे कोविड केअर रुग्णालय सुरू करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा केली. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे हे रुग्णालय बंद करण्यात आले होते.
दरम्यान, आता पुन्हा तालुक्यात दुसरी लाट उसळली आहे. गेल्या चार दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजअखेर तालुक्यात ४०८६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील ३४७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १८० जणांना जीव गमवावा लागला आहे. ३१९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
तालुक्यातील ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने पुढाकार घेत येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये कोरोना रुग्णालय सुरू केले आहे. येथे ३१ बेड आहेत. यातील नऊ बेडना एचएफएनओ सुविधा आहे, तर उर्वरित बेड ऑक्सिजनेटेड आहेत.