डॉल्बीवाल्यांना न्यायालयाचा दणका
By Admin | Updated: September 11, 2015 00:53 IST2015-09-11T00:52:53+5:302015-09-11T00:53:54+5:30
शिराळ््यातील नाग मंडळे अडचणीत : जप्त केलेले डॉल्बीचे साहित्य परत न करण्याचे न्यायालयाचे आदेश

डॉल्बीवाल्यांना न्यायालयाचा दणका
सांगली : शिराळा येथे नागपंचमीवेळी काढलेल्या मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा दणदणाट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या नाग मंडळे व डॉल्बी मालकांना जिल्हा न्यायालयाने गुरुवारी जबर चपराक दिली. त्यावेळी जप्त केलेले डॉल्बी परत देऊ नयेत, असा आदेश न्यायालयाने दिला. शिराळा न्यायालयाने डॉल्बी परत करण्याचे आदेश दिले होते. या निकालाला पोलिसांनी आव्हान दिले होते. त्यावर जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला.
गेल्या महिन्यात नागपंचमी झाली. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. यावेळी डॉल्बीचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करू नका, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नाग मंडळांना केले होते, पण तरीही शिराळ्यातील १४ नाग मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केला होता. डॉल्बीचा आवाजही मर्यादेपेक्षा जादा होता. पोलिसांनी त्यांना आवाज कमी करण्याविषयी सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नव्हते. डॉल्बीचा दणदणाट सुरुच ठेवला होता. डॉल्बीचा आवाज व ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा त्यांनी भंग केला होता. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळांचे कार्यकर्ते, डॉल्बी मालक व चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. १४ डॉल्बी जप्त करण्यात आले होते.
जप्त केलेले डॉल्बी परत करावेत, अशी मागणी डॉल्बी मालक व नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शिराळा न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने हे डॉल्बी परत द्यावेत, असा आदेश दिला होता. या आदेशाला पोलिसांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर गेल्या आठवड्यापासून सुनावणी सुरु होती. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, नाग मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाहीत. त्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. आता जर त्यांना डॉल्बी परत केले, तर ते पुन्हा गणेशोत्सवात डॉल्बीचा दणदणाट सुरुच ठेवतील. यातून ध्वनी प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे डॉल्बी परत देऊ नयेत. बचाव पक्षाच्या वकिलांचाही युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन, जप्त केलेले डॉल्बी परत देऊ नयेत, असा निकाल न्यायालयाने दिला. या निकालामुळे नाग मंडळे व डॉल्बी मालकांना चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)