इस्लामपुरातून पानसरेंसाठी अडीचशेवर वकिलांची फौज
By Admin | Updated: September 28, 2015 23:45 IST2015-09-28T22:04:28+5:302015-09-28T23:45:08+5:30
धनाजी गुरव : सत्तरजणांच्या स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती

इस्लामपुरातून पानसरेंसाठी अडीचशेवर वकिलांची फौज
इस्लामपूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पानसरे कुटुंबियांतर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी इस्लामपुरातील २७0 वकिलांची फौज तयार झाल्याची माहिती विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत दिली. आतापर्यंत ७0 वकिलांनी वकीलपत्रावर स्वाक्षरी केली असून मंगळवारी उर्वरित २00 वकील स्वाक्षरी करणार आहेत.गुरव म्हणाले की, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेच्या समीर गाकवाड या संशयित आरोपीसाठी ३0 वकिलांनी बाहेरुन येऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे विद्रोही चळवळीने कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्यावतीने बहुजन समाजातील जास्तीत जास्त वकिलांनी या खटल्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला येथील इस्लामपूर वकील संघटनेने प्रतिसाद दिला. अध्यक्ष अॅड. अर्जुन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. अॅड. एस. यु. संदे म्हणाले की, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यातच संशयित समीर गायकवाड यास निर्दोष ठरविण्याचे प्रयत्न त्याच्या वकिलांकडून केले गेले. कॉ. पानसरे यांनी आपले आयुष्य चळवळीला दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने लढू.
‘अंनिस’चे एल. डी. पाटील म्हणाले की, कॉ. पानसरेंच्या हत्येत केवळ समीर—रुद्रपर्यंतची यंत्रणा नाही. यामध्ये मोठी साखळी आणि षड्यंत्र आहे.
यावेळी दीपक कोठावळे, दिग्विजय पाटील, अॅड. ए. एल. मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)
त्यांची जागा दाखवू!
गुरव म्हणाले की, न्यायाची गरज म्हणून संशयित गायकवाडसाठी युक्तिवाद करणे मान्य, पण न्यायालयाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी विचारांची मर्यादा सोडून बेताल आणि समाजात भीती पसरविणारी विधाने केली. त्यांच्या वक्तव्यातून न्याय व्यवस्थेलाच बटिक बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. यापुढील काळात सनातनी वृत्ती हस्तक्षेप करतील, तर राज्यातील बहुजन समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल.