मिरजेत गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:54+5:302021-09-03T04:26:54+5:30

फ़ोटो ओळ : मिरज पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या प्रतिआंदोलनात उपसभापती अनिल आमटवणे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ...

Counter-agitation in support of Miraj group development officers | मिरजेत गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन

मिरजेत गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन

फ़ोटो ओळ : मिरज पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या प्रतिआंदोलनात उपसभापती अनिल आमटवणे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मिरज : मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनाला शह देण्यासाठी, गटविकास अधिकारी यांच्या कामकाजावर विश्वास दर्शवित पंचायत समितीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह पूर्वभागातील विविध गावांतील सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर गुरुवारी प्रतिआंदोलन केले. आंदोलनावेळी सरगर यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर हे सभापतींना विश्वासात न घेता कामकाज करीत आहेत. एरंडोली ग्रामपंचायतीत कर वसुलीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई पक्षपातीपणाची व राजकीय हेतूने केली असल्याचा आरोप करीत भाजपचे पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांनी बुधगाव व एरंडोली येथील ग्रामस्थांसमवेत गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या कारभाराची चौकशी व बदलीच्या मागणीसाठी मंगळवारी आंदोलन केले होते.

या आंदोलनाला शह देण्यासाठी व आप्पासाहेब सरगर यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे उपसभापती अनिल आमटवणे व सलगरचे सरपंच तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज पंचायत समितीसमोर प्रतिआंदोलन केले. पंचायत समितीचे सदस्य अशोक मोहिते, कृष्णदेव कांबळे, छाया हात्तेकर, पूनम कोळी तसेच प्रमोद इनामदार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते. सरगर हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत. पूर्वभागातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. अशा अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशा आशयाचे सभापती गीतांजली कणसे यांना निवेदन देण्यात आले.

चौकट

आरोपात तथ्य नाही

गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार न करता पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी योग्य समन्वय राखत कामकाज केले आहे. तालुक्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे उपसभापती अनिल आमटवणे व सलगरचे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.

Web Title: Counter-agitation in support of Miraj group development officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.