Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचारात नगरसेवकांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:27 IST2019-04-18T23:26:38+5:302019-04-18T23:27:12+5:30
शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले ...

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचारात नगरसेवकांची पायपीट
शीतल पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले असताना, महापालिकेच्या नगरसेवकांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. ‘स्वाभिमानी’साठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत, तर भाजपच्या नगरसेवकांनीही प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारात जोर कमी आहे.
महापालिकेत भाजपचे ४१ व दोन सहयोगी असे ४३ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे २० व राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. आठ महिन्यांपूर्वीच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेला होता. महापालिका क्षेत्रात काँग्रेस आघाडीला ३६ टक्के, तर भाजपला ३५ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला दीड टक्का मते मिळाली. यावेळी लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाकडे असली तरी, उमेदवार मात्र काँग्रेसच्या घरातील आहे. त्यामुळे प्रचाराच्या सुरूवातीपासूनच काँग्रेसचे नगरसेवक सक्रिय झाले होते. त्यात महापालिकेत मदनभाऊ पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मदनभाऊ-विशाल पाटील गटातील मतभेद विसरून सारेच कामाला लागले.
प्रचाराच्या दुसºया आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाग घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवकही स्वाभिमानीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र येऊन शहरात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रचार सुरू आहे. पदयात्रा, मेळावे, बैठका घेऊन पाटील यांनी प्रचारात रंगत आणली आहे.
दुसरीकडे भाजपमध्ये काहीकाळ शांतता होती. काही मोजकेच नगरसेवक प्रचारात दिसत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर मात्र भाजपचे नगरसेवकही प्रचारात उतरले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला जात आहे.
काहीजण तळ्यात-मळ्यात
दोन्ही बाजूंचे काही नगरसेवक अद्यापही तळ्यात-मळ्यात आहेत. वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने या नगरसेवकांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यात रसद मिळाली नसल्यानेही काहीजण लांब आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत खर्च अधिक झाला आहे. त्यात निवडणुका म्हटल्या की मतदारांच्या अपेक्षा असतात. वरून रसद न आल्याने त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या? असा सवाल करीत काहीजणांनी रसद आल्यानंतर बघू, अशी भूमिका घेतली आहे.
महाआघाडी, महायुतीचा अपक्षांशी संपर्क
महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीला उधाण आले होते. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाल्याने या पक्षात मोठी बंडखोरी झाली होती. अपक्ष उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस व भाजपने प्रभागात दोन हजारपेक्षा जादा मते मिळालेल्या अपक्षांशी संपर्क साधला आहे. महापालिका निवडणुकीतील त्यांची नाराजी दूर करून त्यांनाही प्रचारात सक्रिय केले जात आहे.