कापूसखेडमध्ये एकरी १२७ टन उसाचे उत्पादन;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:01+5:302020-12-05T05:09:01+5:30
इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रात ६३.७३२ टन विक्रमी ऊस ...

कापूसखेडमध्ये एकरी १२७ टन उसाचे उत्पादन;
इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप तुकाराम पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रात ६३.७३२ टन विक्रमी ऊस उत्पादन घेतले. त्यांनी सरासरी एकरी १२७.४६४ टन उत्पादन घेतले. या क्षेत्रात त्यांना एका गुंठ्यामध्ये ३ टन १८६ किलो असा उतारा पडल्याने या परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
माजी सरपंच प्रदीप पाटील यांना राजकारणाबरोबरच शेतीची आवड आहे. त्यांना रामलीला उद्योग समूहाचे शहाजी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. पाटील यांनी ८६०३२ या जातीच्या दोन डोळा टिपरी उसाची लागण जूनच्या सुरुवातीस केली होती. उसाची उगवण क्षमता चांगली व्हावी म्हणून कांड्या द्रावणात बुडवून त्यांची लागण केली. सहाव्या आठवड्यानंतर नत्राचीही मात्रा दिली. पंचेचाळीस दिवसांनंतर बुरशीनाशक फवारणी केली. त्यामुळे उगवण चांगली होऊन उसाची उंची वाढली. उसाला ठिबकद्वारे पाण्यात विरघळणारी खते घालण्यात आली. त्यामुळे उसाची २२ ते २५ कांड्यांपर्यंत वाढ झाली. या त्यांच्या ऊस उत्पादित शेतीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, ऊस विकास अधिकारी एस. एस. पाटील यांनी भेट दिली.
फाेटाे : ०४१२२०२०-आयएसएलएम-कापूसखेड न्यूज
ओळ : कापूसखेड येथे विक्रमी २२ कांड्यांचे ऊस उत्पादन करणारे शेतकरी प्रदीप पाटील.