आईच्या श्राध्दाचा खर्च दुष्काळग्रस्तांना

By Admin | Updated: May 18, 2016 00:15 IST2016-05-17T23:57:36+5:302016-05-18T00:15:44+5:30

भाळवणीच्या दीपक माळींचे दातृत्व : जिल्हाधिकाऱ्यांकडे ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द

The cost of the mother's expense to the drought-hit | आईच्या श्राध्दाचा खर्च दुष्काळग्रस्तांना

आईच्या श्राध्दाचा खर्च दुष्काळग्रस्तांना

अजित कदम -- भाळवणी --कुटुंबियातील आनंदाच्या कार्यक्रमातील खर्चात बचत करून सामाजिक कार्याला आर्थिक मदत करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असताना, जन्मदात्या आईच्या वर्षश्राध्दाचा होणारा खर्च दुष्काळाने होरपळणाऱ्या दुष्काळग्रस्तांना देण्याचे दातृत्व भाळवणी (ता. खानापूर) येथील दीपक तुकाराम माळी व त्यांच्या पत्नी खानापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. वैशाली माळी यांनी दाखविले आहे. त्यांचे दातृत्व म्हणजे दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचाच नव्हे, त्यांचे दु:ख हलके करण्याचाच प्रयत्न माळी दाम्पत्याने केला आहे. भाळवणीचे दीपक माळी यांनी ५१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.भाळवणी येथील दीपक माळी यांची आई व खानापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. वैशाली माळी यांच्या सासू प्रमिला तुकाराम माळी (वय ६५) यांचा तिसरा स्मृतिदिन होता. त्यामुळे वर्षश्राध्दासाठी लोकांना भोजन व अन्य खर्च करण्यापेक्षा खानापूर तालुक्यातील भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी हा पैसा वापरण्याचा निर्णय माळी दाम्पत्याने घेतला. त्यानुसार वर्षश्राध्द धार्मिक विधीप्रमाणे करून या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम दुष्काळग्रस्त निधीला देण्यासाठी माळी दाम्पत्याने ५१ हजार रूपयांचा धनादेश तयार केला.
सोमवारी दुपारी आ. अनिल बाबर यांच्याहस्ते हा ५१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, दीपक माळी, विट्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, जोतिराम पवार, नामदेव पवार, अनिल चव्हाण, राजू सूर्यवंशी, विजय यादव, शहाजी धनवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक माळी यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)

दातृत्व आदर्शवत...
दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. स्वत:च्या घरातील कार्यक्रमाला फाटा देऊन या आपत्तीला आर्थिक मदत करण्याचे धाडस फारच कमी लोकांच्यात असते. मात्र, दीपक माळी व सभापती वैशाली माळी यांनी आईच्या वर्षश्राध्दाचा खर्च देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे दातृत्व आदर्शवत राहील, अशी प्रतिक्रिया आ. अनिल बाबर व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली.


 

Web Title: The cost of the mother's expense to the drought-hit