बोरगावला नदीत मृत माशांचा खच
By Admin | Updated: May 7, 2015 00:31 IST2015-05-07T00:30:10+5:302015-05-07T00:31:41+5:30
दूषित पाणी : रासायनिक पदार्थ नदीपात्रात मिसळल्याचा परिणाम

बोरगावला नदीत मृत माशांचा खच
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात बुधवारी हजारो मासे मेल्याने पाण्यावर तरंगताना आढळून आले. रासायनिक पदार्थ किंवा साखर कारखान्यांची मळी मिसळल्याने हा प्रकार घडला असावा, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने नदीपात्रातील पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. याचा अहवाल आल्यानंतरच मासे कशामुळे मृत झाले, हे समजणार आहे. बुधवारी सकाळी अचानक नदीपात्रातील पाणी काळे दिसू लागले. त्यानंतर काही तासातच मासे मरून पाण्यावर तरंगताना दिसू लागले. दूषित पाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी होऊ लागल्यामुळे सुरुवातीला लहान मासे तडफडू लागले. त्यानंतर मोठे मासेही तडफडताना ग्रामस्थांनी पाहिले. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील बहुतांशी माशांच्या प्रजाती व लहान—मोठे मासे मृत झाले आहेत.
दरम्यान, हे रसायनमिश्रित पाणी पिण्यात आले तर नदीकाठावरील ग्रामस्थांचेही आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मासे मृत झाल्याचे समजताच दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आले. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. दोन दिवसात या पाण्याचा अहवाल आल्यानंतरच माशांच्या मरण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्रदुषणास जबाबदार असलेल्या संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांची चौकशी करा
कृष्णा नदीपात्रात कोणत्या कारखान्याकडून आम्ल व मळीचे पाणी सोडले आहे, त्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी. रेठरेहरणाक्ष गावच्या कृष्णा नदीपात्रातही व मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांची चौकशी करा. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशारा रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी मोरे यांनी दिला आहे.