लाचखोर सहाय्यक निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:27+5:302021-03-31T04:27:27+5:30
सांगली : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी एक लाखाच्या लाच प्रकरणातील विटा पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक प्रदीप पोपट ...

लाचखोर सहाय्यक निरीक्षकाला अटक
सांगली : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी एक लाखाच्या लाच प्रकरणातील विटा पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक प्रदीप पोपट झालटे (वय ३५, रा. मूळ बार्शी, सोलापूर, सध्या रा. विटा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजर झाला. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी पोलीस हवालदार विवेक पांडुरंग यादव (२८) व खासगी एजंट अकीब फिरोज तांबोळी (२३, विटा) या दोघांना अटक करण्यात आली होती.
तक्रारदार खासगी ठिकाणी दिवाणजी आहेत. तक्रारदारांच्या मालकाविरोधात विटा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराच्या मालकास अटक केली होती. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी सहायक निरीक्षक झालटे व यादव यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. झालटे व यादव या दोघांनी दीड लाखाची मागणी करून एक लाख रुपये आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विटा पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. लाच घेताना यादव आणि खासगी एजंट तांबोळी या दोघांना अटक केली. लाच घेताना झालटे उपस्थित नव्हता. कारवाईची चाहूल लागल्यानंतर तो पसार झाला. चौकशीत झालटे, यादव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांसह तांबोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. झालटे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बुधवारी हजर झाला आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.