महापालिका अधिकार्यांवर फौजदारी दाखल करणार
By Admin | Updated: May 29, 2014 00:50 IST2014-05-29T00:50:06+5:302014-05-29T00:50:31+5:30
सतीश साखळकर : शहरातील रस्ते परग्रहासारखे सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली तर हे रस्ते परग्रहावरील वाटत आहेत.

महापालिका अधिकार्यांवर फौजदारी दाखल करणार
सतीश साखळकर : शहरातील रस्ते परग्रहासारखे सांगली : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली तर हे रस्ते परग्रहावरील वाटत आहेत. शहरात ड्रेनेज, मोबाईल व केबलसाठी मोठ्या प्रमाणावर चरी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. या सर्व गोष्टींना महापालिकेतील अधिकार्यांची सुंदोपसुंदी जबाबदार आहे. त्यांनी कारभारात सुधारणा केली नाही, तर अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी बुधवारी आयुक्तांना दिला आहे. साखळकर यांनी आयुक्त अजिज कारचे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक नूतन लोकप्रतिनिधींचे मंडळ स्थापन झाल्यापासून शासनाच्या विविध अनुदानातून ७० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. अधिकार्यांमधील सुंदोपसुंदीमुळे सर्व रस्त्यांच्या कामांना जाणीवपूर्वक विलंब होत आहे. तांत्रिक कारणे दाखवून कामे थांबविली जात आहेत. या सर्वांमागे ठेकेदारांचे कल्याण करण्याचा वास येत आहे. येत्या १५ जूनपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, याची माहिती वरिष्ठ व कनिष्ठ अभियंत्यांना असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरभर खोदण्यात आलेल्या चरींमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची कोंडी होत असतानाच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. शारीरिक दुखण्याच्या त्रास सहन करीत नागरिक दैनंदिनी पार पाडत आहेत. येत्या तीन दिवसांत रस्त्याची कामे सुरू न झाल्यास अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू. संबंधित यंत्रणेकडून रस्त्यांची कामे होणार नसतील तर सांगलीतील रस्ते बांधकाम विषयातील तज्ज्ञ अभियंत्यांना घेऊन युवामंचच पूर्णत्वास नेण्यास तयार आहे. तशी परवानगी महापालिकेने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)