कोरोनोची लाट; भाजीपाला उत्पादकांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:34+5:302021-05-31T04:20:34+5:30
तासगाव : कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लाॅकडॉऊन जाहीर केला. त्यामुळे आठवडा बाजार बंद झाले. त्याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला ...

कोरोनोची लाट; भाजीपाला उत्पादकांची लागली वाट
तासगाव : कोरोनोच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लाॅकडॉऊन जाहीर केला. त्यामुळे आठवडा बाजार बंद झाले. त्याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांना उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे भर भाजीपाल्यात रोटर फिरवून सगळे उत्पादन मातीत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तासगाव तालुक्यात द्राक्षाचे प्रमुख पीक असले तरी अनेक शेतकऱ्यांनी नगदी उत्पादनासाठी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. तालुक्यात सुमारे दोनशे हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला होता. मात्र, कोरोनाच्या लाटेमुळे भाजीपाला उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. पाठोपाठ जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे तासगाव तालुक्यातील सर्व आठवडा बाजार बंद झाले आहेत. भाजीपाला उत्पादकांची खरी भिस्त आठवडा बाजारावर होती. मात्र, आठवडा बाजार बंद असल्यामुळे भाजीपाल्याचे काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
व्यापाऱ्यांकडून भाजीपाल्याची मागणी होत नाही. किरकोळ मागणी झाली तरी कवडीमोलाने मागणी केली जात असल्याने उत्पादन खर्चाची सांगड घालणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहेत. अनेक उत्पादकांनी कवडीमोलाने भाजीपाला विकण्यापेक्षा भाजीपाला पिकावर नांगर फिरवून ते पीक मातीत घातले आहे.
कोट -
आरवडे मांजर्डे रोडला असणाऱ्या शेतात उसात आंतरपीक म्हणून कोबी लावला होता. यासाठी रोपे, खत व अन्य कामांसाठी २० हजार रुपये खर्च झाला होता. ५० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कोणी प्लॉटकडे फिरकले नाही. दीड ते दोन किलोंचा कोबी गड्डा दोन ते तीन रुपयाला मागितला. उत्पादन खर्चसुद्धा नाही निघाला म्हणून कोबी बुजविला, पैसे नाही किमान हिरवळीचे खत म्हणून तर फायदा होईल. लॉकडाऊन काळात प्रशासनाचे कोणी फिरकलेसुद्धा नाही.