एसटीच्या ‘शिवशाही’ प्रवासाला कोरोनाची खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:49+5:302021-03-31T04:26:49+5:30
सांगली : मुंबई, पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सांगली, मिरजेतून पुणे, स्वारगेट, मुंबई मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसच्या ...

एसटीच्या ‘शिवशाही’ प्रवासाला कोरोनाची खीळ
सांगली : मुंबई, पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सांगली, मिरजेतून पुणे, स्वारगेट, मुंबई मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसच्या ५० टक्के फेऱ्या रद्द केल्या आहेत. उत्पन्नही ६० ते ७० टक्क्यांनी घटल्यामुळे शिवशाही बस मार्गावर आणणे सध्यातरी एसटी प्रशासनासमोर मोठे आव्हान दिसत आहे.
जिल्ह्यात शिवशाही बसेसची ३२ संख्या असून, त्या मिरज आणि सांगली आगाराकडेच आहेत. यापैकी बहुतांशी बसेस स्वारगेट, पुणे मार्गावरच सोडल्या होत्या. मागील आठवड्यापासून शिवशाहीला ५० टक्केच प्रवासी मिळत आहेत. यामुळे सांगली, मिरजेतील पुणे मार्गावरील चार शिवशाही बसेस बंद केल्या आहेत. प्रवासी संख्या ४० टक्केपेक्षा कमी झाल्यास उर्वरित शिवशाहीही टप्प्याटप्प्याने बंद कराव्या लागणार आहेत, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट
सांगली विभागाकडे ३२ शिवशाही बसेस असून, त्यापैकी २८ शिवशाहीच स्वारगेट, पुणे मार्गावर धावत आहेत. या बसेसच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. पूर्वी शिवशाही बस पुण्याला जाऊन आली की १७ ते १८ हजारांचे उत्पन्न मिळत होते. यामध्ये ६० ते ७० टक्के घट झाली असून, सध्या केवळ सात ते आठ हजार रुपयेच उत्पन्न मिळत आहे. यामुळे काही शिवशाही संध्या बंद केल्या आहेत.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सांगली विभाग.
चौकट
सांगली-स्वारगेटला फटका
एसटीच्या शिवनेरी बस प्रामुख्याने पुणे व मुंबईदरम्यान धावतात. मिरज, सांगलीतून स्वारगेट, पुणे, स्टेशन व शिवाजीनगर येथून दादर, मुंबई या गाड्या जातात. सांगली, मिरज स्थानकातून दररोज जवळपास ४० ते ४५ फेऱ्या होतात. प्रत्येक बसमागे १८ ते १९ हजारांचे उत्पन्न मिळत होते. सर्व शिवशाही फुल चालू होत्या; पण कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे गेल्या आठवड्यापासून स्वारगेट येथून येणे-जाण्याचे उत्पन्न सात ते आठ हजार रुपये आहे. यामुळे एसटी महामंडळाला शिवशाहीचा तोट्यातील हा प्रवास फार काही दिवस चालविता येईल, अशी परिस्थिती नाही. शिवशाही वगळता अन्य बसेसच्या उत्पन्नात खूपच घट झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चौकट
-जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या : ३२
-सध्या सुरू असलेल्या शिवशाही : २८