मिरज कोविड प्रयोगशाळेत ‘कोरोना पाॅझिटिव्ह’चे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:27+5:302020-12-13T04:40:27+5:30

मिरजेतील जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी होते. १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर एप्रिल व ...

Coronary positives decreased in Miraj Kovid laboratory | मिरज कोविड प्रयोगशाळेत ‘कोरोना पाॅझिटिव्ह’चे प्रमाण घटले

मिरज कोविड प्रयोगशाळेत ‘कोरोना पाॅझिटिव्ह’चे प्रमाण घटले

मिरजेतील जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी होते. १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजार संशयितांच्या तपासणीत केवळ ७० पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मिरजेतील प्रयोगशाळेत दरारोज तीनशे नमुन्यांची तपासणी क्षमता असतानाही दररोज हजारावर तपासण्या झाल्या. प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून जूनपर्यंत दैनंदिन दीडशे ते दोनशे नमुन्यांच्या तपासणीत पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ दोन टक्के होते. मात्र जूनपासून नमुन्यांची व पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत गेली. जून-जुलै महिन्यात दररोज हजार नमुन्यांच्या तपासणीत शंभर ते दीडशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नमुन्यांची संख्या व पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. या काळात दररोज तपासणीसाठी आलेल्या सरासरी दीड हजार नमुन्यांपैकी तीस ते चाळीस टक्के रुग्ण पाॅझिटिव्ह हाेते. या काळात कोविड प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ व डाॅक्टरांनाही कोविडची लागण झाल्याने उपचार घ्यावे लागले. या आणीबाणीच्या काळातही कोविड प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ व डाॅक्टरांनी अखंड काम केले.

ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांतच सुमारे १९ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. पाॅझिटिव्ह नमुन्यांची दोनवेळा तपासणी करावी लागत असल्याने प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर ऑक्टोबरपासून नमुन्यांची संख्या तेवढीच असली, तरी पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण पाच ते सहा टक्क्यांवर आल्याने दिलासादायक चित्र आहे.

चाैकट

कोरोना साथीदरम्यान मिरज शासकीय कोविड प्रयोगशाळेने संशयित कोविड पाॅझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे महत्त्वाचे काम केले. एप्रिल-मे महिन्यात निगेटिव्ह रुग्णांची संख्या जास्त होती. त्यानंतर पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत गेली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ४० ते ७० टक्क्यापर्यत पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Coronary positives decreased in Miraj Kovid laboratory