जिल्ह्यात ३३ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:43+5:302021-04-06T04:24:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ ३३ गावांनीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग गावाच्या ...

जिल्ह्यात ३३ गावांनी वेशीवरच रोखला कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ ३३ गावांनीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग गावाच्या वेशीवरच रोखला असल्याची सुखद वार्ता आहे. गावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांची त्यांना खूप मदत झाल्याचे गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी सांगितले.
इस्लामपूरमध्ये मार्च २०२० ला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमित रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात शिराळ्यासह जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांवरही संक्रमित रुग्णाची नोंद करण्यात आली. गावामध्ये व वॉर्डनिहाय वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून चारवेळा सर्वेक्षण करण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आल्या. मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या व्यक्तींना सक्तीने स्थानिक शाळांमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करून आजारी व्यक्तींशी वारंवार संपर्क साधण्यात आला. आवश्यक तेव्हा तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची तपासणी तसेच त्यापैकी आजारी व्यक्तींची आवश्यकतेनुसार स्वॅब तपासणी करणे यांसारख्या उपाययोजना गावोगावी करण्यात आल्याने जिल्ह्यातील ५ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत ३३ गावे कोरोनामुक्त आहेत. गावकऱ्यांची सकारात्मक वृत्ती, त्याला प्रशासनाची समर्थ अशी साथ मिळाल्याने ग्रामीण भागातील ३३ गावांना कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली.
चौकट
या गावांनी रोखले कोरोनाला
जत तालुका : मोकाशेवाडी, वाशान, शिंगणापूर, करजगी, अक्कळवाडी, माणिकनाळ, कोणबगी, लवंगा, कागनरी.
खानापूर : ताडाचीवाडी, जाधवनगर, बाणूरगड.
शिराळा : शिवरवाडी, कुसळेवाडी, बेरडेवाडी, खुंदलापूर, मानेवाडी.
आटपाडी : पारेकरवाडी, कुरुंदवाडी.
वाळवा : भरतवाडी, नायकलवाडी, शेखरवाडी, कोणोली वसाहत-येलूर.
मिरज : शेणेवाडी, पाटगाव, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी, पायाप्पाचीवाडी, चाबूकस्वारवाडी, निलजी, बामणी, खोतवाडी.
चौकट
नेमके काय केले?
-प्रत्येक गावात २२ मार्च २०२० पासून कोरोना संनियंत्रण व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.
-ग्रामस्तरीय कोरोना संनियंत्रण समितीद्वारे गावोगावी ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
-निर्जंतुकीकरण करण्यासाठी धुरळणी व सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
-कोविड १९ चा संसर्ग गावात होऊ नये, याकरिता जनजागृती.
-प्रत्येक व्यक्तीने नियमित हात धुणे, सॅनिटायझर, साबण तसेच चेहऱ्याला मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले.
-संसर्गापासून बचावासाठी जाहीर प्रसिद्धिपत्रक व ध्वनिक्षेपकाद्वारे प्रबोधन केले.
कोट
गावामध्ये प्रत्येकाला मास्कची सक्ती आणि बाहेरून आले की अंगोळ करणे, स्वच्छता राखण्याची सक्ती केली. गावामध्ये औषध फवारणीवर भर दिला. बाहेरून आलेल्या व्यक्तीला सक्तीने शाळेतच १४ दिवस क्वारंटाईन केले. प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे गावात शंभर टक्के वाटप केले. यामुळेच गावात आजपर्यंत कोरोना रुग्ण नाही.
-बबन माळी, सरपंच, शेखरवाडी, ता. वाळवा.