मासिक पाळीतही कोरोनाची लस सुरक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:06+5:302021-05-07T04:28:06+5:30
सांगली : मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस धोकादायक असल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवरून व्हायरल होत आहेत. ते पूर्णत: चुकीचे आणि घबराट ...

मासिक पाळीतही कोरोनाची लस सुरक्षितच
सांगली : मासिक पाळीच्या काळात कोरोनाची लस धोकादायक असल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवरून व्हायरल होत आहेत. ते पूर्णत: चुकीचे आणि घबराट निर्माण करणारे असल्याचे स्पष्टीकरण स्त्रीरोगतज्ज्ञांनी केले आहे. मासिक पाळीच्या कालावधीतही लस घेतलीच पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
कोरोना व लसीसंदर्भात गैरसमज पसरविणाऱ्या मेसेजचा सोशल मीडियावरून महापूर आला आहे. कोणताही शास्त्रीय आधार नसणाऱ्या माहितीद्वारे दिशाभूल केली जात आहे. यापैकीच एक पोस्ट म्हणजे मासिक पाळीत लस टोचून घेणे असुरक्षित असल्याची. या काळात महिलांची प्रतिकार क्षमता कमी असल्याने पाळीपूर्वी व पाळीनंतर पाच दिवस लस घेऊ नये, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे; पण हा मेसेज पूर्णत: खोटा असून महिलांनी लस टाळू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रतिकार क्षमता कमी असल्यास कोरोना संसर्गाचा धोका बळावतो हेदेखील लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. लस घेतली नाही तर कोरोनाच्या संसर्गाची भीतीही व्यक्त केली आहे. आरोग्यासंदर्भात सोशल मीडियावर दररोज धडाधड पोस्ट पडत असल्याच्या काळात त्यांची छाननी करूनच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिकार क्षमता कमी होते हादेखील गैरसमज आहे. त्यामुळे लसीकरणे टाळणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
गाइडलाइन काय सांगते ?
१ एखादे इंजेक्शन घेतल्यानंतर ॲलर्जी येत असेल तर त्यांना लस देऊ नये. विशिष्ट अैाषधांची ॲलर्जी असणाऱ्यांनीही लस टाळावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२ गरोदर महिलांना कोरोनाची लस देऊ नये. ॲलर्जी निर्माण झाली किंवा इतर गुंतागुंत निर्माण झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
३ ज्यांना अतर आजारांवर ॲन्टिबायोटिक अैाषधे सुरू आहेत किंवा ते गंभीर आहेत अशा रुग्णांना लस देता येणार नाही.
स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात?
कोट
मासिक पाळीमध्ये लस घेण्यासंदर्भातील निर्णय संबंधित महिलेने स्वत: घ्यावा. काही महिलांना या काळात पोटदुखीचा त्रास जास्त होतो, शिवाय लस घेतल्यानंतर काहीसा तापही येतो. त्यामुळे लस घेण्याविषयी निर्णय महिलेने स्वत: घ्यावा. अर्थात, लस घेणे सुरक्षितच आहे.
- डॉ. प्रिया प्रभू-देशपांडे, सांगली
कोट
मासिक पाळीमध्ये कोरोनाची लस धोकादायक असल्याच्या मेसेजला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या काळात महिलांची प्रतिकार क्षमताही कमी झालेली नसते. त्यामुळे चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. लस घेणे कधीही सुरक्षितच असते.
- डॉ. शिल्पा दाते, सांगली
पॉइंटर्स
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी - २६,१९०
पहिला डोस घेतलेले फ्रंटलाइन वर्कर्स - २५,०३५
दुसरा डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी - १५,२०४
दुसरा डोस घेतलेले फ्रंटलाइन वर्कर्स - ८,४३१