कोरोनाच्या लसीने नपुंसकत्व, निपुत्रिकपणा आणि मृत्यूदेखील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:37+5:302021-05-31T04:19:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लसीकरण सुरू होऊन पाच महिने झाले तरी अफवांचा बाजार थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शंभर ...

Corona vaccine impotence, infertility and even death! | कोरोनाच्या लसीने नपुंसकत्व, निपुत्रिकपणा आणि मृत्यूदेखील!

कोरोनाच्या लसीने नपुंसकत्व, निपुत्रिकपणा आणि मृत्यूदेखील!

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लसीकरण सुरू होऊन पाच महिने झाले तरी अफवांचा बाजार थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शंभर टक्के लसीकरणात अडचणी येण्याची भीती आहे. अफवांमुळे लस नाकारण्याकडे अनेकांचा कल आहे.

कोरोनावर लसीचा उतारा दिलासा देणारा ठरला. पण तिच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. लसीने नपुंसकत्व येते, ही सर्वात वेगाने पसरलेली अफवा ठरली. ग्रामीण भागात अफवा जोरात होत्या. त्यामुळे लसीकरणाने पहिल्या टप्प्यात अपेक्षित वेग घेतला नाही. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण पहिल्या टप्प्यात होते, पण अफवा आणि भीतीपोटी त्यांनी लस घेतलीच नाही.

जिल्ह्यात ३० हजार कर्मचाऱ्यांपैकी पहिल्या दिवशी फक्त ४५६ जण आले. जानेवारीअखेरपर्यंत १४ दिवसात फक्त ७ हजार २४ जणांनी लस घेतली. भीती व गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेतली, सुरक्षिततेचा निर्वाळा दिला, तरीही भीती कायम होती. शेवटी प्रशासनाने पगार बंदीचा दंडुका उगारला. लस नाही तर पगारही नाही, अशी तंबी दिली. त्यानंतर हळूहळू लसीकरणाने गती घेतली. तरीही सुमारे हजारभर कर्मचाऱ्यांनी लस अजूनही घेतलेली नाही. अफवांचे १०० टक्के निराकरण अजूनही झालेले नाही.

चौकट

नपुंसकत्व, निपुत्रिकपणा आणि मृत्यूदेखील...

म्हणे नपुंसकत्व येते...

कोरोनाच्या लसीमुळे पुरुषांना नपुंसकत्व येते ही सर्वात जोरात पसरलेली अफवा ठरली. विशेषत: शहरी भागातून तिने गावांकडे प्रवास केला. लसीच्या पुरेशा चाचण्या झाल्या नसून ती धोकादायक असल्याचे सांगितले जात होते. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांचाही परिणाम झाला.

प्रजनन क्षमता गमावण्याची भीती

महिलांनी लस घेतली तर प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, या गावगप्पादेखील जोरात आहेत. अजूनही काही गावांत त्या जोर धरून आहेत. त्यामुळे महिला वर्ग लसीसाठी बाहेर पडलाच नाही. विचारणा केली असता, आम्ही घरातच असतो, लस कशासाठी घ्यायची? असा प्रतिप्रश्न करतात.

लसीमुळे कोरोना आणखी ताकदवान होतो

लस म्हणजे कोरोनाचे कमी ताकदीचे विषाणूच आहेत, शरीरात सोडल्यावर आणखी ताकदवान होतात, त्यामुळे कोरोनापासून संरक्षण मिळतच नाही, उलट कोरोना वाढतो असा गप्पांचा बाजारही रंगला. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांची नकारघंटा कायम राहिली.

कोट

लस घेतली, तरीही कोरोना झालाच की!

मित्राने लस घेतल्यानंतरही कोराना झालाच, त्यामुळे लस कशासाठी घ्यायची? असा विचार केला. पण गावात कोरोनाने काहीजणांचे मृत्यू झाल्यावर धाडस करून लस घेतली. महिला झाला तरी काही त्रास झालेला नाही.

- शीतल चव्हाण, ग्रामस्थ, बामणोली

लस घेतल्याने वेगवेगळा त्रास होतो, असे मोबाईलवर वाचले, पण विश्वास ठेवला नाही. आता लस घ्यायची आहे, पण संपल्याचे सांगत आहेत. आरोग्य केंद्रात लस आल्यावर घेणार आहे.

- गजानन केरीपाळे, ग्रामस्थ, पाटगाव

लसीशिवाय पर्याय नाही...

जानेवारीत लस आली तेव्हा अफवांचा पाऊस पडला. एप्रिलमध्ये सर्वसामान्यांसाठी ती उपलब्ध झाली, तेव्हा लोकांना जबरदस्तीने बाहेर काढावे लागले. आता गैरसमज दूर झाले आहेत. लसीशिवाय पर्याय नसल्याचे कळून चुकले आहे. लस मिळवण्यासाठी लोक पळापळ करताहेत.

- कृष्णदेव कांबळे, पंचायत समिती सदस्य, भोसे.

पॉईंटर्स

आजपर्यंत झालेले लसीकरण...

पहिला डोस दुसरा डोस एकही डोस न घेतलेले

आरोग्य कर्मचारी २७,३७३ १६,१८४ ८५१

फ्रंटलाईन वर्कर्स ३०,१५१ ११,१७९ ३५००

ज्येष्ठ नागरिक २,४८,४७६ ६०,८२६ ३,४०,०००

४५ ते ६० वर्षे वयोगट २,५२,४९० ३०,०४३ ११,६७,४६७

१८ ते ४४ वर्षे वयोगट १६,५२९ ००० १७,४४,००८

Web Title: Corona vaccine impotence, infertility and even death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.