विट्यात दीडशे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:42+5:302021-06-18T04:18:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले होते. हे निर्बंध आता शिथिल केल्यानंतर शहरातील ...

विट्यात दीडशे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले होते. हे निर्बंध आता शिथिल केल्यानंतर शहरातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत; परंतु विटा नगरपालिका प्रशासनाने शहरातील दुकाने सुरू करण्यापूर्वी व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विटा शहरातील १३२ व्यापाऱ्यांची आरोग्य विभागाने कोरोना चाचणी घेतली. या चाचणीत सर्व व्यापाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, विटा शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यासह विटा शहर व खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावले होते; मात्र गेल्या चार दिवसांपासून हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्यामुळे शहरात सध्या नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ सुरू करण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने पहिल्यांदा व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेऊन नंतरच दुकाने सुरू करण्याची मोहीम राबविली आहे. नगरपालिकेच्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिकेच्या व्यापारी संकुलांसह शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.
विटा नगर परिषदेच्या या मोहिमेंतर्गत गुरुवारी शहरातील १३२ व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
विटा शहरासह खानापूर तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ लागला असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.