कोरोनामुळे साखर कारखाने आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:58+5:302021-05-14T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : कोरोना महामारीमुळे साखर कारखान्यांचा गत हंगाम व येणारा हंगाम हा साखर उद्योगाला आव्हानात्मक ठरणार ...

कोरोनामुळे साखर कारखाने आर्थिक संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : कोरोना महामारीमुळे साखर कारखान्यांचा गत हंगाम व येणारा हंगाम हा साखर उद्योगाला आव्हानात्मक ठरणार आहे. ऊस तोडणी कर्मचारी कोरोनामुळे ऊस तोडणी कामापासून अलिप्त राहात आहेत. ऊस वाहतूकदारांनाही आर्थिक फटका बसला आहे. सर्वच कारखाने आर्थिक अडचणीत आहेत, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एस. माने यांनी केले.
वाळवा येथील हुतात्मा कारखाना कार्यस्थळावर गळित हंगामाच्या ऊसतोडणी व वाहतूक करारप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक माने बोलत होते. संस्थापक डाॅ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर यांच्या हस्ते करून ऊसतोडणी व वाहतूक करार नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी माने म्हणाले, कारखान्यांना शासकीय धोरणामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऊसबिले, ऊसतोडणी व वाहतूक बिले अदा करता आलेली नाहीत. चालू हंगामाच्या यशस्वीतेसाठी प्रतिदिन सात हजार टन ऊस क्रशिंग करणारी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभी करण्यात येत आहे.
शेती अधिकारी चव्हाण म्हणाले, यासाठी ७५० बैलगाडी, २५० अगंद व ट्रॅक्टर, सात तोडणी मशीन यंत्र याप्रमाणे करार करण्यात येत आहेत.