शिंदेवाडीतील पोपट माने यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना गावातील कोविड कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री शिंदेवाडीचे माजी सरपंच संजय माने, राजा माने, पवन माने या तिघांनी कोविड विलगीकरण कक्षात जाऊन पोपट माने यांना चपलाने मारहाण केली. मिरज ग्रामीण पोलिसांनी मारहाणीबाबत तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप पोपट माने व त्यांची पत्नी रूपाली माने यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तिघांनी मारहाण केल्याची पोपट माने यांची तक्रार आहे. पोपट माने यांच्या पत्नी रूपाली ग्रामपंचायत सदस्या आहेत. भावकीतील विरोधी गटातील लोकांनी पतीला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. गावातच असलेल्या कोविड विलगीकरण कक्षात इतर कोरोनाबाधित रुग्णांसमोरच माने यांना चप्पल व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.