कोरोनाने अनाथ ७०० मुलांचे शैक्षणिक पालकत्व जैन संघटना घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST2021-06-19T04:18:15+5:302021-06-19T04:18:15+5:30
सांगली : कोरोनामध्ये पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांचे शैक्षणिक पालकत्व भारतीय जैन संघटना स्वीकारणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या ...

कोरोनाने अनाथ ७०० मुलांचे शैक्षणिक पालकत्व जैन संघटना घेणार
सांगली : कोरोनामध्ये पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांचे शैक्षणिक पालकत्व भारतीय जैन संघटना स्वीकारणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींचे शिक्षण, निवास व्यवस्था, जेवण व वैद्यकीय सुविधा आदींची जबाबदारी संघटनेने घेतल्याची माहिती संघटनेचे संचालक सुरेश पाटील यांनी दिली.
कोरोनामुळे राज्यभरात अनेक कुटुंबातील कर्ती माणसे मरण पावली. त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबण्याचा धोका आहे. हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. पाटील म्हणाले की, संघटनेने यापूर्वीही किल्लारी भूकंपातील बाराशे विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील अकराशे आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ७०० मुले अशा तीन हजार मुलांना आधार दिला आहे. त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे.
कोरोनाकाळातही असाच सेवाभावी उपक्रम संघटना राबवत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन कुटुंबातील पालकांकडून संमतीची पत्रे घेतील. पुण्यात वाघोली येथील शैक्षणिक संकुलात मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येईल. सुरुवातीला शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येईल. शाळा प्रत्यक्ष सुरू होताच शैक्षणिक संकुलात पाठवण्यात येईल. संघटनेने ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, भूकंपग्रस्त, पूरग्रस्त क्षेत्रात मदतकार्य केलेले आहे. कोरोनाच्या संकटात फिरता दवाखाना, अँटिजन चाचण्या, मिशन झिरो, लसीकरण, प्लाझ्मादात्यांची नोंदणी, रक्तदान चळवळ, कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन बँक असे अनेक मानवतावादी उपक्रम राबवले आहेत.
याकामी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगोंडा पाटील, वसंत पाटील, दीपक पाटील, अविनाश चौगुले, सुभाष देसाई परिश्रम घेत आहेत.
चौकट
संपर्काचे आवाहन
कोरोनामध्ये पालक गमावलेल्या मुलांच्या नातेवाइकांनी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा संघटनेच्या प्रतिनिधीकडे देता येतील.