घरात राहूनच थांबेल कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:43+5:302021-04-18T04:25:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता घरातच राहणे हा एकमेव चांगला उपाय आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी ...

Corona infection will stop at home | घरात राहूनच थांबेल कोरोनाचा संसर्ग

घरात राहूनच थांबेल कोरोनाचा संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता घरातच राहणे हा एकमेव चांगला उपाय आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

राजमती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व जैन समाजाच्या सहकार्याने सांगलीत भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचा प्रारंभ करण्यात आला. याचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

जयंत पाटील म्हणाले, काेरोनाची दुसरी लाट पाहता मर्यादित वैद्यकीय साधनांचा विचार करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहून स्वत:ची व समाजाची काळजी घ्यावी. सर्वांच्या घरात थांबण्याने हे संकट टळणार आहे. ऑक्सिजन निर्मितीची क्षमता सध्या मर्यादित आहे. रुग्णसंख्या व बेडची स्थिती सध्या पाहिली तर तिलाही मर्यादा पडत आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करून आपण सध्या घरातच राहावे. भगवान महावीर कोविड हॉस्पिटल थोड्या कालावधीत उभारण्यात आले असून याचा रुग्णांना चांगला फायदा होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत.

हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले, गेल्या वर्षी जैन समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून ७५ लाखांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली. त्यातून हे रुग्णालय उभारले. गेल्या वर्षी २७५ रुग्णांवर येथे उपचार झाले होते. रुग्णांना मोफत भोजन व अल्पदरात उपचाराची सुविधा केली जात आहे. प्रारंभी ३० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यामध्ये १५ खाटा आयसीयू व्हेंटिलेटर व १५ खाटा ऑक्सिजनयुक्त असतील. डॉ. पवन गायकवाड यांच्याकडून रुग्णांचे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार आहे. डाॅ. वैशाली कोरे, डॉ. नीरज व डॉ. दिनेश भबान, डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. अमोल सकळे व डॉ. अमोल पाटील सेवा देणार आहेत. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पहिले कोविड हॉस्पिटल सुरू केल्याबद्दल ट्रस्टचे कौतुक केले. राजगोंडा पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Corona infection will stop at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.